रामापूर : पाटण तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरत आहे. हे चांगले असले तरी तो पूर्ण कमीही झालेला नाही. मात्र, तिसऱ्या लाटेसंदर्भात आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांच्या मते, पुढील शंभर ते सव्वाशे दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. तरीही ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येत आहेत. मागील २८ महिने शाळा बंद होत्या. मग अजून तीन महिने शाळा बंद ठेवल्यास काय बिघडेल, शाळांमधून तिसऱ्या लाटेचा उदय झाल्यास तो किती महागात पडू शकेल. यासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये चर्चा होत आहे.
जिल्हा आणि तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन कसून काम करते आहे. त्याला यश येताना दिसत आहे; पण अजून पूर्ण यश आलेले नाही. तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय म्हणून शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील आठवी ते बारावी वर्गाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आठवी ते बारावीच्या शाळा सुरूदेखील झाल्या आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितल्यानुसार पुढील शंभर ते सव्वाशे दिवस लहान मुलांकरिता अत्यंत महत्त्वाचे आहेत. असे असताना शाळा सुरू करण्याची गडबड कशासाठी चालली आहे, हा प्रश्न पालकांना सतावत आहे. या शाळांच्या मधून तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे तिसरी लाट आली तर याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न नागरिक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मधून विचारला जात आहे.
चौकट
महाविद्यालय बंद
राज्यात तालुक्यात अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू आहे. ज्याचे लसीकरण झाले त्याचे महाविद्यालय सुरू करण्यात शासन उदासीन आहे. ज्याचे लसीकरण झालेच नाही त्याची शाळा सुरू करण्याची घाई केली जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या कारभाराविषयी पालकवर्गातून आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली जात आहे.