कऱ्हाड : जे चाळीस चोर ज्या पद्धतीने सेनेशी बेईमानी करून पळून गेले, त्या चोरांनी शिवसेना आणि धनुष्यबाण विकत घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, ते खोकेवाले जनतेची हिम्मत कशी विकत घेणार, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
कऱ्हाड येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री संजय राऊत यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी माध्यमांनी छेडले असता ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, शहरप्रमुख शशिराज करपे, उपप्रमुख अक्षय गवळी, विनायक भोसले, काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र माने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, शिवसेना हा जनतेच्या सामर्थ्यातून निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला हा पक्ष किंवा ठाकरे कुटुंब संपले, असे वाटते त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घ्याव्यात. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही, हेच राज्यभर फिरल्यावर दिसून येते, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची शिवगर्जना यात्रा सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात ती आमची नसून जनतेची शिवगर्जना आहे, हे पाहायला मिळत आहे. जनतेच्या मनात काय चीड निर्माण झाली आहे, ती खोकेवाल्यांनी पाहावी, असेही त्यांनी सांगितले.आपण निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर सांगलीच्या कार्यक्रमात बोललात, याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, निवडणूक आयोगाने खालच्या पातळीवर निर्णय दिले तर चालतात का? आणि मी दिल्या त्या शिव्या नाहीत, हे तुम्ही शब्दकोषामध्ये तपासून पाहा, असेही राऊत यांनी सांगितले.
मी एवढा असभ्य माणूस आहे का ?चोरमंडळ म्हटल्याने तुम्हाला हक्कभंगाची नोटीस आली आहे का ? याबाबत विचारताच खासदार राऊत म्हणाले, मी एवढा असभ्य माणूस आहे का ? मला मराठी भाषा त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त समजते.
त्यांचा मेंदू ढिल्ला आहे...नीलेश राणे तुमच्यावर खालच्या पातळीवर टीका करीत आहेत. तुम्ही काय सांगाल, असे माध्यम प्रतिनिधींनी विचारल्यानंतर त्यांचा मेंदू आणि सगळंच ढिल्लं आहे, अशी मिश्कील टिपण्णी त्यांनी केली.