सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांना नकली वाघनखे आणि खऱ्या वाघांना खोटे म्हणणाऱ्या नकली नेत्यांना शिवरायांच्या खऱ्या वाघांचे महत्त्व कसे कळणार? अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेते नकली आणि त्यांचे मंत्रीही नकली, असा टोला लगावला.
लंडन येथील म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी संग्रहालयात लोकांसाठी शुक्रवारी खुली करण्यात आली. यावेळी संग्रहालयाच्या इमारतीचे उद्घाटनही झाले. यानंतर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, आदी उपस्थित होते.
मर्दानी खेळांनी जागवला शिवकाल
संग्रहालयाच्या दर्शनी भागात कोल्हापूर येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या मावळ्यांकडून ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विटा, बाण, पट्टा लढत, काठी, कुऱ्हाड व तलवारीच्या लढतींनी डोळ्यांचे पारणे फेडले.
गौरवाची बाब
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वाघनखे महाराष्ट्रात आली ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. अफलजलखान हा महाराष्ट्रावर चढाई करून आला होता. शिवाजी महाराजांना संपविण्याची त्याने सुपारी घेतली होती.
मात्र, शिवाजी महाराजांनी त्यालाच संपवले. हा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्या हत्याराने त्यांनी अफजलखानाचा वध केला ती वाघनखे आता सातारा येथील शिवाजी संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत.
शस्त्रांचे प्रदर्शन
लंडनमधून आलेल्या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही संग्रहालयात भरविण्यात आले आहे.