म्हसवड : ‘उरमोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी माझ्या माण आणि खटाव तालुक्यांच्या हक्काचं आहे. इथल्या मातीची आणि जनतेची तहान भागल्याशिवाय या पाण्याचा एक थेंबही देवापूरच्या पुढे जाऊ देणार नाही,’ असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला. या पाण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम आणि संघर्ष केला आहे, त्यामुळे पाणी आल्यावर आता जलपूजनाचे बारसं कुणीही घातलं तरी पोरगं आमचंच असल्याचे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.म्हसवड येथे रथगृहाशेजारील बंधाºयात उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला भगवानराव गोरे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, विजय धट, डॉ. वसंत मासाळ, सोमनाथ भोसले, दादा काळे, अकील काझी, संजय जगताप, लुनेश वीरकर, बाळासाहेब पिसे, शशिकांत गायकवाड, म्हसवडचे आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.आ. गोरे म्हणाले, ‘उरमोडीच्या पाण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम केले आहेत. फलटणकर नसते तर २० वर्षांपूर्वीच हे पाणी माणमध्ये आले असते. सध्याचे मुख्यमंत्रीही उरमोडीचा विषय निघाला की जयकुमारचे नाव घेतात. आताही हे पाणी एक महिना सलग सुरू राहणार आहे. पाणी पुढे न्यायचा विषय समोर येत आहे; मात्र आमची तहान भागल्याशिवाय एकही थेंब पुढे जाणार नाही.उरमोडीचे पाणी हवे असेल तर आमच्या सोळा गावांना टेंभूचे पाणी द्यावे लागेल. भाजपच्या मंत्र्यांनी तसा निर्णय घेतल्याचे समजत आहे. महाबळेश्वरवाडीच्या तलावातून पुढे १६ गावांना ते पाणी कसे जाणार, याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे,’ असेही त्यांनी सांगितले.माता-भगिंनीच्या डोळ्यात आनंदाश्रूपावसाने ओढ दिल्याने पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. म्हसवड परिसरातील शेतकरी महिलांनी आ. गोरेंकडे उरमोडीचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याच पाण्याने भरलेल्या बंधाºयात जलपूजन करताना जमलेल्या माताभगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. हे पाणी आमच्या जगण्याची आशा आहे, अशा प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
बारसे कोणीही घातलं तरी पोरगं आमचंच:जयकुमार गोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:06 AM