सातारा : सदर बझार येथील लक्ष्मी टेकडी डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने पालिका आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या पथकाने शनिवारी दिवसभर या वस्तीतील घरांची पाहणी करून परिसरात वर्षानुवर्षे पडलेल्या कचऱ्याची साफसफाई केली. यावेळी हिवताप अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत दोन घरांतील बॅरेलमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. याच वस्तीतील ६२ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी हिवताप आरोग्य विभागाने घेतले आहे. शुक्रवारी लक्ष्मी टेकडी येथील रहिवासी कविता पवार यांना डेंग्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते. तरी देखील आरोग्य विभागाला याची कानोखबर नव्हती. शनिवारी ‘लोकमत’ मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक रणदिवे यांनी आरोग्य विभागाचे बारा कर्मचाऱ्यांसह घटना ठिकाणी सकाळी सात वाजता संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. पाण्याचा ड्राय डे घेऊन परिसरात जंतूनाशक पावडरची फवारणी करून नागरिकांना स्वच्छताबाबत सूचना केल्या. डेंग्यूचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हा हिवताप अधिकारी एस. व्ही. उरडे, सहायक हिवताप अधिकारी डी. एस. गबंरे यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकासोबत संपूर्ण परिसराची पाहणी केली. यामध्ये वस्तीतील ११६ घरांची तपासणी केली. वस्तीतील घरांमध्ये पाण्याने भरलेले बॅरेल, कँटरची तपासणी केली असता दोन कँटरमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचे अधिकाऱ्यांने ‘लोकमत’ला सांगितले. तर जवळपास संशयित म्हणून ६२ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहे. सिव्हिल रुग्णालयात दोन संशयित डेंग्यू रुग्ण दाखल झाल्याचे समजते.(प्रतिनिधी) ‘लोकमत’चे आभार ! लक्ष्मी टेकडीच्या स्वच्छतेसाठी वर्षानुवर्षे आम्ही मागणी करत आहे. ही वस्ती अनेक रोगांनी ग्रासले असून, सध्या या वस्तीतच डेंग्यूचा रुग्ण आढळून आला तरी प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही. परंतु ‘लोकमत’मधून ही बातमी प्रसिद्ध होताच संपूर्ण परिसराची स्वच्छताबरोबरच तपासणी करून औषधोपचार सुरू झाल्याने येथील नागरिकांनी ‘लोकमत’चे आभार मानले. डेंग्यू डासांची पैदास स्वच्छ पाण्यातच ...डेंग्यू डासांची पैदासही स्वच्छ पाण्यातच होते. त्यामुळे घरातील वापरासाठी अथवा पिण्यासाठी भरून ठेवलेले पाणी झाकून ठेवावे, तर डेंग्यू डास दोन ते ती किलोमीटर परिसरात जाऊ शकतो. तरी या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे आवाहनही यावेळी हिवताप अधिकाऱ्यांनी केले आहे. मादी डासामुळेच होतो डेंग्यू...नर व मादी या डेंग्यूच्या डासापैकी मादी डास चावल्याने डेंग्यूची लागण होते. हा डास फक्त दिवसा चावतो म्हणून या डासाला ‘टायगर मॉस्किटो’ असे म्हणतात. नर हा झाडांच्या पानावर पाच ते सहा दिवस जगत असतो तर मादी डास रक्त शोषून २७ ते २८ दिवस जगत असते. यामुळे दिवसा चावणाऱ्या डासांवर अधिकच लक्ष ठेवण्याची सूचना यावेळी नागरिकांना देण्यात आली आहे. आरोग्य सेविकांनी दिले प्रशिक्षण...डेंग्यूचा प्रसार होऊ नये, यासाठी पालिका आरोग्य विभाग व हिवताप अधिकाऱ्यांनी येथील नागरिकांना डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांमध्ये जागृती व्हावे म्हणून शनिवारी सहा आरोग्य सेविकांमार्फत नागरिकांना आरोग्य प्रशिक्षण दिले.
‘लोकमत’च्या डेंग्यू वृत्तानंतर प्रशासनाला भरली हुडहुडी
By admin | Published: November 05, 2016 11:09 PM