म्हसवड : ‘महाराष्ट्र विकास औद्योगिक कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्याअंतर्गत विविध कामांसाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रुपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी ६० लाख ९७ हजारांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसीकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे,’ अशी माहिती एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.
अविनाश सुभेदार म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती. तीच गरज ओळखून मंत्री सुभाष देसाई, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र व कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो. या प्रयत्नांना यश आले असून, साताऱ्याच्या केंद्रासाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या केंद्रांतर्गत अग्निशमन वाहने, इमारत बांधकाम, कर्मचाऱ्यांसाठी घरे आदी सोयीसुविधा राबविल्या जाणार आहेत. आपत्कालीन प्रसंगावेळी या अग्निशमन केंद्राचा फायदा सातारा परिसरासह जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कोरेगाव येथील मिनी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे याठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ६० लाख ९७ हजार रुपयांची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे रस्त्यांची दुरुस्ती होऊन चांगले रस्ते तयार होणार आहेत.
सातारा व कोरेगाव एमआयडीसीच्या कामांचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास)चे अध्यक्ष उदय देशमुख व उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते यांच्याकडे देण्यात आले.
कोट...
प्रशासकीय सेवेत विविध पदांवर असताना आपल्या जिल्ह्यात विविध विकासकामे आणण्यासाठी प्रयत्न केले. आता एमआयडीसीत कार्यरत असल्याने आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसींसाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करता येतोय. आता सातारा व कोरेगाव एमआयडीसीसाठी निधी आणू शकलो. माण तालुक्यात आठ हजार एकर क्षेत्रात एमआयडीसी उभी राहत आहे. यासाठीही सर्व यंत्रणा कार्यान्वित आहे. लवकरच त्याठिकाणीही एमआयडीसी उभी राहील. प्रशासकीय सेवेत असताना आपल्या भागासाठी काहीतरी करता येतेय याचे मला खूप समाधान वाटतेय. यापुढेही आपल्या जिल्ह्यातील एमआयडीसीसाठी विविध प्रकारे निधी,उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
-अविनाश सुभेदार, सहमुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी महाराष्ट्र राज्य
०३म्हसवड
अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सातारा व कोरेगाव एमआयडीसी अंतर्गत कामांच्या निधीचे प्रशासकीय मान्यतेचे पत्र स्वीकारताना उदय देशमुख, राजेंद्र मोहिते उपस्थित होते.