प्रगती जाधव-पाटील
सातारा : शहरीकरणाच्या वाढत्या व्यापात मानवाने जाणते-अजाणतेपणी वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केला आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे, या उद्देशाने डोंगर उतारावर बांधलेल्या घरांमधून नाचणारा मोर विलोभनीय तर वावरणारा बिबट्या भयावह वाटू लागला आहे. परस्परांच्या अधिवासात सुरू असलेले अतिक्रमण त्रासदायक असले तरीही त्याची सवय करून घेऊन मानव आणि बिबट्या संघर्ष टाळणे महत्त्वाचे आहे.
वनक्षेत्रालगत वास्तव्य करणाऱ्या शहरातील अनेकांनी बिबट्याला पाहिले असल्याच दावा केला आहे. विनाकारण वन्यप्राण्यांना डिवचून त्यांना हल्ला करण्यासाठी निमंत्रण देण्याचे प्रकार सुरू असतात. तीन वर्षांपूर्वी वणवा लागला म्हणून शाहूपुरीत पिल्लांसह बिबट्या एका ओघळीत बसला होता. बिबट्या तिथे आहे याची चाहुल लागल्यानंतर झुंडीने लोक तिथे पोहोचले. त्याला हुसकावण्यासाठी काहींनी दगड धोंडेही त्याच्या दिशेने भिरकावले. असुरक्षितता जाणवल्यानंतर बिबट्याने एका नागरिकावर हल्ला चढवला. हा अपवाद वगळता बिबट्याने मानवी वस्तीत येऊन हल्ला चढविल्याचा जिल्ह्यात कुठेही ऐकिवात नाही.
उघड्यावरचा कचराही देतोय आमंत्रण
- अनेकदा वन्यप्राण्यांच्या अधिवासात हस्तक्षेप केल्याने त्यांना शिकारीला प्राणीच मिळत नाहीत. आपली भूक भागविण्यासाठी बिबटे भक्ष्य शोधत मानवी वस्तीकडे येतात.- ज्या भागांमध्ये उघड्यावर कचरा टाकला जातो तिथे श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो.- वनक्षेत्रात झगडून शिकार मिळविण्यापेक्षा कचऱ्यातून अन्न शोधणाऱ्या श्वानांची शिकार करणे त्याला कमी त्रासाचे वाटते. ग्रामीण भागातही उघड्यावर बांधलेल्या शेळ्या आणि गायी म्हशींवर हल्ला होतो.
अशी आहे नुकसानभरपाई
बिबट्याला संवर्धन आणि संरक्षण दिल्यानंतर त्याच्या हल्ल्यात कोणी जखमी, अपंग किंवा मृत्यूमुखी पडले तरीही त्याला नुकसानभरपाई देण्याचे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. या अंतर्गत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना १५ लाख रूपयांची भरपाई शासनाकडून तातडीने देण्यात येते. हल्ल्यात कायमस्वरूपी अपंग झालेल्यांना ५ लाख रूपयांची तर गंभीर जखमी झालेल्यांना १.२५ लाख रूपयांची मदत केली जाते. सातारा जिल्ह्यात गत महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. ही जिल्ह्यातील एकमेव घटना आहे.
त्यांचाही विचार व्हावा!
आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्याची धमक मानवात आहे. मात्र, मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. बऱ्याचदा याच काळात पिल्लांच्या अन्नासाठी बाहेर पडलेल्या मादी बिबट्यावर विषप्रयोग, त्यांची शिकार किंवा मग पिंजऱ्यातून अन्यत्र हलविले जाते. मादी बिबट्याशिवाय या पिल्लांना अन्नासाठीही तडफडत बसावे लागते.