सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाजवळ आज, बुधवारी सकाळी मानवी कवटी आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडाली. ही मानवी कवटी इतक्या निष्काळजीपणे शवविच्छेदन विभागातून बाहेर कशी आली, की अन्य कुठून तिथे टाकण्यात आली. याबाबत पोलीस आता कसून तपास करू लागले आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाजवळ मानवी कवटी दिसत असल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलीस तेथे गेल्यानंतर त्यांनी शहानिशा केली असता ही मानवी कवटी असल्याचे समोर आले. मात्र इथे नेमकी मानवी कवटी कशी आली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. शवविच्छेदन गृहामध्ये शवविच्छेदन केल्यानंतर सर्व अवयव मृतदेहासोबत ठेवले जातात, असे असताना ही धडा वेगळी कवटी शवविच्छेदन गृहाबाहेर कशी आली. असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
या घटनेची शहानिशा करण्यासाठी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे तेथे गेले. त्यांनी पाहणी केल्यानंतर हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी कबूल केले. जर शवविच्छेदन गृहामध्ये हा प्रकार घडला असेल तर संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.दरम्यान, ही मानवी कवटी आता शवविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे तसेच गरज पडली तर डीएनए चाचणीही करण्यात येणार आहे. त्यानंतरच ही मानवी कवटी नेमकी कोणाची होती, हे समोर येणार आहे.शवविच्छेदन ग्रहाभोवती भटक्या कुत्र्यांचा वावरजिल्हा शासकीय रुग्णालयात असणाऱ्या शवविच्छेदन ग्रहाजवळ सातत्याने भटकी कुत्री वावरत असतात. शवविच्छेदन केल्यानंतर काही अवयव बाहेर तर फेकत नसेल ना असाही शंका आता येऊ लागली आहे. कारण भटकी कुत्री ही नेहमीच या भोवती घिरट्या घालत असतात.गेल्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी मानवी अवयवांचे लचके तोडताना भटक्या कुत्र्यांना काही लोकांनी पाहिले असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे ही मानवी कवटी जोपर्यंत कोणाची आहे, हे निष्पन्न होत नाही तोपर्यंत या प्रकरणाची गूढता अधिकच वाढत आहे.