अजय जाधव ।उंब्रज : लहान मुलांना नेहमीच रंगीबेरंगी आणि फॅशनेबल कपड्यांच आकर्षण असतं; पण ‘तो’ कचºयाच्या ढिगात असलेल्या कपड्यातच आपली फॅशन शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होता. पोटात माजलेलं भुकेचं काहूर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मात्र, त्यावेळी त्याला भुकेपेक्षा उघडे अंग झाकण्यासाठी कपडे हवे होते आणि त्याची हे निरागस धडपड पाहून हेलावलेली माणुसकी मदतीला धावली. अनेकांनी घरातील स्वत:च्या मुलांचे कपडे आणून त्याला दिले. आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
कचऱ्यात टाकलेल्या कपड्यातून स्वत:चे अंग झाकण्यासाठी कपडे शोधणारा चिमुकला हे दृश्यच हृदय पिळवून टाकणारे. हे दृश्य पाहिले आणि पाहणाऱ्यांच्यातील माणुसकी जागी झाली. त्यातील एकाने घरी जाऊन स्वत:च्या मुलाची कपडे पिशवीतून आणली. दुसऱ्याने त्याला नवीन साबणाने अंघोळ घातली. त्यानंतर त्या चिमुकल्याने कपडे परिधान करीत आपल्या झोपडीकडे धूम ठोकली. उंब्रजच्या कृष्णा नदीतरी घडलेला हा प्रसंग माणुसकी अजूनही जिवंत असल्याची जाणीव करून देतो. उंब्रजला कृष्णा नदीकाठावरील महादेव घाटावर सायंकाळी उंब्रजमधील काही युवक सहज फिरायला गेले होते.
यावेळी या घाटाशेजारी टाकण्यात आलेल्या कचºयातील कपडे अस्ताव्यस्त करून त्यात शोधाशोध करणारा एक उघडा चिमुकला त्यांना दिसला. गावाच्या गटाराची घाण, त्यातच पडलेला कचरा आणि त्यात पडलेल्या कपड्यातून स्वत:साठी कपडे शोधणारा चिमुकला, हे दृश्यच मन हेलावणारे होते. उपस्थितांची अवस्थाही तशीच झाली. सर्वांचे डोळे पाणवले. त्यातील एकजण जवळच असलेल्या आपल्या घरी गेला. आपल्या मुलाची जमतील तेवढी कपडे त्याने पिशवीत भरली. नवीन साबण घेऊन पुन्हा कृष्णाकाठावर आला.
कपडे शोधण्यासाठी घाणीत गेलेल्या त्या चिमुकल्याचे अंग भरले होते. त्याला एकाने स्वत: साबण लावून आंघोळ घातली. अंग पुसले. घरातून आणलेल्या कपड्यातील एक ड्रेस त्याच्या अंगावर घातला. हे सर्व करत असताना त्या चिमुकल्याच्या चेहºयावरील भाव मात्र बदलत होते. सुरुवातीला घाबरलेल्या त्या चिमुकल्याच्या चेहºयावर हळूहळू हास्य निर्माण होऊ लागले आणि तो बोलता झाला.
उंब्रजशेजारी असलेल्या एका वस्तीमधील तो चिमुकला होता. आर्थिक परिस्थितीमुळे त्याने आजअखेर शाळेची पायरी चढलेली नाही. याच वस्तीतील मुलांबरोबर तो घाटावर आला होता. कृष्णा नदीत जमतील तेवढे मासे पकडून त्यांनी घाटावर जाळ करून त्यावर मासे भाजून पोटाची आग विझवली. मासे खाऊन सवंगडी निघून गेले. हा मात्र आपल्या अंगावर घालण्यासाठी फाटका ड्रेस तरी मिळेल, या आशेने कचºयातील कपड्यात स्वत:साठी ड्रेस शोधत होता.
एकीकडे मुलांना पोहण्यास येणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना स्विमिंग टँक, विहीर, नदीवर घेऊन जाऊन त्यांंची काळजी घेणारे पालक दिसतात. तर दुसरीकडे स्वत:च्या व कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कामावर गेलेल्या पालकांना आपला पाल्य दिवसभर काय करतो, काय खातो याची माहितीही नसते. या चिमुकल्यांनी नदीत मासे पकडून काठावर ते भाजून खाल्ले. त्याचबरोबर पाणीही तेथीलच पिले. पोटाची खळगी भरण्यासाठी झोपडीतील मुले वारंवार येथे येतात.शाळेत जाण्याचा दिला शब्दअशा चिमुकल्यांतील एका चिमुकल्याला उपस्थितांनी आंघोळ घालून कपडेही घातली. यावेळी शाळा सुरू झाली की, शाळेत जाणार हा शब्दही त्याने आनंदात दिला. हा शब्द पाळणे त्याला जमेल की नाही, हे सांगणे अवघड असले तरी काही क्षणासाठी तरी त्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे सर्व करणाºया उपस्थितांनी माणुसकीही जपली.कचऱ्यात कपडे शोधणाऱ्या मुलाला अंघोळ घालून युवकांनी त्याला नवीन कपडे घातली.उंब्रज, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठावर एक चिमुरडा कचऱ्याच्या ढिगात कपडे शोधत होता.