वडूज : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्यातृतीया एक मुहूर्त तसेच रमजान ईद या सणांची सांगड घालून गुंजभर सोने खरेदी करण्यापेक्षा रुग्णालयात कॊरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना अल्पोपाहार वाटप करण्यात आला. मनसे कार्यकर्ते सूरज लोहार यांनी वडूजमध्ये माणुसकी जपली व दोन्ही धर्मांचे सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करून पुढील पिढीला दिशा दिली.
चारचाकी वाहनांचे पाटे बसविणे, दुरुस्त करणे अशी कामे करणाऱ्या वडूज येथील गरीब कुटुंबातील सूरज विलास लोहार यांचे दुकान लॉकडाऊनमुळे बंद आहे. अशा वेळी उधारीचे पैसे व बचतीच्या पैशातून कुटुंबांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वत्र आर्थिक परिस्थिती बदलली आहे. लोकांना रोजगार नाही, दोनवेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. अशावेळी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गुंजभर सोने खरेदी करण्यापेक्षा माणुसकी जपू, असा विचार गरीब कुटुंबातील लोहार यांनी मांडला. त्याला आई मंगल व वडील विलास, पत्नी सोनाली यांनी सहमती दर्शवली. त्यानुसार अक्षय्यतृतीय व रमजान ईदनिमित्त वडूज ग्रामीण रुग्णालयात या सणांपासून दररोज अल्पोपाहार मोफत देत आहेत.
जगाला शांतीचा संदेश देणारे ईश्वर-अल्ला व संत, युगप्रवर्तक यांनीच माणुसकी हाच धर्म असल्याचे सांगितले आहे. त्यांनी समाजापुढे ठेवलेल्या आदर्शाचे अनुकरण केले असल्याचे मनसे कार्यकर्ते सूरज लोहार यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या वडिलांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात करून विजय मिळवला आहे. त्यामुळे संकटाला सामोरे जाताना दुसऱ्यालाही मदत करण्याच्या उद्देशाने पदरमोड करणाऱ्या लोहार कुटुंबातील सदस्यांचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.
या उपक्रमासाठी वाकेश्वरचे शशिकांत फडतरे, सौरभ जाधव, हॉटेल व्यावसायिक राजू गाढवे, विशाल लोहार, ऋषिकेश लोहार, अभिजित साळुंखे व वैभव जाधव तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारीवर्ग यांनी मोलाचे योगदान दिले. दरम्यान, सफाई कामगार, पोलीस व होमगार्ड, रुग्णांच्या नातेवाइकांनासुद्धा मोफत अल्पोपाहार वाटप केला.
प्रतिक्रिया...
जे आहे त्यात समाधानी आहे. माझी आर्थिक परिस्थिती चांगली असती तर निश्चितच स्वखर्चाने कोरोना उपचार केंद्र सुरू केले असते. पण, ज्यांना ते शक्य आहे. त्यांनी निश्चितच विचार करावा. देवळात हात जोडण्याबरोबरच मदतीचा हात केव्हाही महत्त्वाचा असतो.
- सूरज लोहार
१५सूरज लोहार
वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात सूरज लोहार हे अल्पोपाहार वाटप करत असतात. (छाया : शेखर जाधव)
--------------------