सातारा - राज्यातील भीषण पूरस्थितीमुळे अनेक जिल्ह्यात मानवहानी आणि वित्तहानी झाली आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सिंधुदर्ग जिल्ह्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अक्षरश: गावंची गावं पाण्याखाली गेली आहेत. कवि कुसुमाग्रज यांच्या कवितेत म्हटल्याप्रमाणे गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात , भींत खचली चूल विझली होते नव्हेत गेले, अशीच परिस्थिती पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांची झाली आहे. मात्र, या पूरस्थितीतही पावलोपावली माणुसकीचे दर्शन घडत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्याचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर तेथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठकही मुख्यमंत्र्यांनी घेतली. पूरग्रस्तांना धीर देण्याचं कामही केलं. मात्र, या शाब्दीक सांत्वनाने पूरपीडितांचे दु:ख दूर होईल का? हा खरा प्रश्न आहे. पुरातील पीडित लोकांना स्थानिकांकडून, सामाजिक संघटनांकडून, सरकारकडून, राजकीय नेत्यांकडून आणि दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात दिला जात आहे. निदान अन्न आणि नावाऱ्याची सोय केली जात आहे. या पीडितांमध्ये चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन जिल्ह्यातील भयानक पूरस्थितीचा फटका सार्वजनिक वाहतूक यंत्रणेलाही बसला आहे. कोल्हापूरचा संपूर्ण राज्याशी संपर्क तुटला आहे. तर, बंगळुरूकडे जाणारा महामार्गही बंद झाला आहे. त्यामुळे जवळपास 5 हजार ट्रक रस्त्यावरच अडकून पडले आहेत. तसेच पुणे-मुंबई रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. मात्र, या संकटातही ठिकठिकाणी माणुसकी पाहायला मिळत आहेत.
ट्रॅफिक हवालदार म्हटलं की गाड्यांना अडवून त्यांच्याकडून पैसा उकळणारा असाच आपला समज असतो. मात्र, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पूरपरिस्थितीमुळे वाठारजवळ अडकलेल्या वाहनधारकांच्या जेवणाची सोय चक्क पोलिसांनी केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, ट्रॅफिक हवालदार या ट्रकचालकांना जेवायला वाढत होते. सातारा पोलिस दलामार्फत या ट्रकवरील लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे, पुन्हा एकदा खाकी वर्दीतली माणूसकी या पुराच्या पाण्यात दिसून आली. रस्त्यावर लावलेल्या ट्रकच्या बाजुलाच ही मंडळी जेवण करताना दिसत आहे. तर, पोलीसच त्यांच्यासाठी अन्नपूर्णा बनले आहेत. दरम्यान, पूरग्रस्ता पीडित आणि स्थलांतरीतांना जेवण देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत.