सातारा : संकट येताना अनेक पावलांनी येत असते. सध्याही कोरोनाचे लॉकडाऊन आणि त्यातच झालेला अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात सापडलेल्या गोरगरिबांच्या मदतीला माणुसकी धावून जाऊ लागली आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी बीड, उस्मानाबाद येथून मोठ्या प्रमाणावर मजूर येत असतात. मोकळ्या रानात झोपड्या टाकून तात्पुरता निवारा केला जातो. सातारा जिल्ह्यातील ठिकाणी अशा पद्धतीने लोक राहत आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता किराणा मालाची दुकानं उघडी ठेवता येत नाहीत.
गोरगरीब रोज मिळालेल्या पैशातून किराणा भरतात. आता दुकाने बंद राहत असल्याने त्यांची गैरसोय झालेली आहे. त्यातच मागील आठवड्यात अवकाळी पावसाने सर्वत्र दणका दिला. अनेक ठिकाणी झाडे कोसळली. पिकांचे नुकसान झाले. याच चिखल राड्यात झोपडीमध्ये राहणारे लोक गांगरून बसले होते. पोटात अन्नाचा कण नाही, अशी परिस्थिती असताना सातारा तालुक्यातील कुमठे येथे स्वामी महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था या गोरगरिबांच्या मदतीला धावली. या गोरगरिबांच्या पालावर जाऊन संस्थेतर्फे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. महिनाभर पुरेल इतके साहित्य गोरगरिबांना मिळाल्याने त्यांची चिंता मिटलेली आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा व भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा स्मिता महेश निकम यांनी या गोरगरिबांच्या निवाऱ्यासाठी व्यायाम शाळेची इमारत खुली करून दिली आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर होण्याआधी म्हणजेच पहिल्या लाटेच्या आदी लोकांनी गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप मोठ्या प्रमाणावर केले; परंतु आता खऱ्या अर्थानं या गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे त्यामुळे सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे.
कोट
ऊस तोडणी कामगार यांना लाॅकडाऊनमुळे झालेल्या गैरसोयीमध्ये किराणा मालाचे वाटप केले. अवकाळी पावसामुळे झालेल्या गैरसोयीमध्ये व्यायामशाळेची इमारत खुली करुन दिली. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे त्यांनी गोरगरीब परिवाराला याच काळात मदत करणे अतिशय आवश्यक आहे.
- स्मिता निकम
फोटो ओळ : कुमठे येथील स्वामी महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोरगरिबांच्या पालावर जाऊन स्मिता निकम यांनी किराणा साहित्याचे वाटप केले.