दशरथ ननावरे --खंडाळा -सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत वन्यप्राण्यांबद्दल घडलेल्या घटना अनाकलनीय आहेत. मनुष्यवस्तीमध्ये वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर धोक्याची घंटा मानली जात आहे. आधुनिकीकरणामुळे डोंगर आणि जंगलभागात मानवाचे अतिक्रमण वन्यजीवांसाठी अडचण ठरत असल्याने वन्यप्राणी असुरक्षितच वाटत आहेत. त्यामुळे ‘उठ मानवा, जागा हो, पाणीमात्रावर दया कर’ अशा शिकवणीची गरज भासू लागली आहे.जिल्ह्यातील पाटण येथे जखमी अवस्थेत आढळलेला अजगर, कण्हेर येथे धरण परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर, गेल्या महिन्यात खंडाळा तालुक्यातील मोर्वे येथे लांडग्यांनी केलेला मेढ्यांच्या कळपावरील हल्ला आणि दोनच दिवसांपूर्वी अंदोरी येथे आढळून आलेले बिबट्याचे अस्तित्व या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे वन्यप्राण्यांचे जीवन अडचणीत येत असल्याचे समोर आले आहे.जंगल परिसर आणि डोंगर कपारीपर्यंत मानवी वस्तीचे राहणीमान दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नैसर्गिक जंगलांची जागा सिमेंटच्या जंगलांनी घेतली आहे. साहजिकच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जंगली प्राण्यांना खाद्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. भेकराचा पाठलाग करून जखमी झालेल्या अजगरावर अद्यापही कऱ्हाड येथे उपचार सुरू आहेत. तर कण्हेर परिसरात पाण्याबाहेर आलेली मगर हाही चिंतेचा विषय आहे.अंदोरी सारख्या दुष्काळी भागात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडले. खंडाळा तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या भोर, पुरंदर येथील डोंगरी भागातून हा बिबट्या आला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी भरकटलेल्या या जीवाची होत असलेली वाताहत कोणामुळे घडतेय याचा मागोवा घेणे गरजेचे आहे.पश्चिम घाट परिसरात असणाऱ्या वन्यजीवांचे राहणीमान बदलू लागले आहे की काय? की माणसाच्या अतिक्रमणामुळे वनसंपदा नष्ट होऊ लागल्याने आणि त्यांना आवश्यक आहार मिळत नसल्याने वन्यप्राण्यांचा वसाहतींमध्ये वावर वाढत चालला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)वन्यजीवांचे वास्तव्य हे डोंगरभागातच असायला हवे. मात्र, अलीकडच्या काळात पश्चिम घाटातील वन्यप्राण्यांची सवय बदलू लागल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य निदर्शनास आले तो भाग नदीकाठचा आणि विशेषत: ऊसशेतीचा आहे. जंगलातील छोट्या प्राण्यांची संख्या कमी झाल्याने शिकारीच्या शोधार्थ बिबट्या येऊ शकतो. ऊसशेतीच्या ठिकाणी भेकर, ससे आणि अन्य प्राणी आढळून येतात. बिबट्या एकटा असले तर चिंतेची बाब नाही. मात्र, त्यांची संख्या जास्त असल्यास ते याठिकाणी राहून पैदास वाढवू शकतात. असे अनेक ठिकाणी आढळून आले आहे.- रवींद्र पवार, प्राणीमित्रअंदोरी भाग हा नदीकाठी आहे. या ठिकाणी असलेल्या बिबट्याचा वावर हा नैसर्गिक वाटत नाही. बिबट्या अन्नाच्या शोधार्थ रात्रीच्या वेळी आला असावा, अशी दाट शक्यता आहे. आमचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा मिळाला नाही.- ए. व्ही. शिंदे, वनक्षेत्रपाल
माणसं जंगलात.. अन् वन्यप्राणी वसाहतीत
By admin | Published: July 21, 2016 11:01 PM