सणबूर : ढेबेवाडी विभागातील वाल्मिक पठार व इतर गावांतील शिवारात रानडुकरे व वानरांनी धुमाकूळ घातला आहे. कित्येक एकर शेतातील पिकांचे त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
ढेबेवाडी विभागात बागायती क्षेत्र कमी प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांची मदार खरीप हंगामावरच असते. खरीप हंगामात प्रामुख्याने ज्वारी, भात, भुईमूग, मका, सोयाबीन व इतर कडधान्याची पिके घेतली जातात. यावर्षी पावसाच्या उघडीपीमुळे पिके चांगली आली. मात्र, रानडुक्करांच्या व वानरांच्या त्रासामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रात्रीच्यावेळी रानडुक्करांच्या झुंडीच्या झुंडी तर दिवसा वानरांचे कळप शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत.
दिवसेंदिवस वाढत असलेले खतांचे दर, मजुरांची कमतरता तसेच लावणीसाठी व बियाण्यांसाठी बँका, सोसायट्यांचे काढलेले कर्ज यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, वाढत्या खर्चाने आधीच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर अधिक कर्जाचा बोजा पडत आहे. कित्येक एकर शिवारातील पिकाची सध्या रानडुकरे व वानरांनी नासधूस केली आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या राखणीसाठी दिवस-रात्र पाळत ठेवावी लागत आहे तर काहींना राखण करणे शक्य नसल्याने शेतातील उभे पीक नष्ट होताना पाहावे लागत आहे.
- कोट
रानडुक्कर व वानरांनी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नाही. शेतीसाठी काढलेल्या कर्जाचे व्याज भरण्याएवढेही उत्पन्न मिळत नाही. याशिवाय वन विभागाकडे याबाबत नुकसानभरपाईसाठी अर्ज केला तर त्यांच्याकडून तुटपुंजी मदत दिली जाते. त्यामुळे वाल्मिक पठारावरील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच पडून आहेत.
- मारुती मस्कर
शेतकरी, कसणी