पाचगणी : पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत असल्याने लाल करप्या रोग व लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाबळेश्वर तालुक्यातील लोकांचे आर्थिक जीवनमान उंचविणारे स्ट्रॉबेरी पीक यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे अडचणीच्या गर्तेत अडकले आहे. या पावसाच्या पाण्याच्या थेंबामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडांच्या पानांवर व येणाऱ्या फुलांच्या बहरारास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढून स्ट्रॉबेरीच्या उत्पन्न वाढीस जोराचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी धास्तावलाय. स्ट्रॉबेरीच्या खर्चाची गुंतवणूक व उत्पन्नाचा मेळच बसणे यावर्षी अवघड झालेलं दिसत आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच हवालदिल झाला आहे.जून महिन्यात सुरु झालेल्या पावसाने आतापर्यंत उसंतच न घेतल्याने स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड सुद्धा वेळेत करणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे मुळातच स्ट्रॉबेरी हंगामावर त्याचा परिणाम झालाय. परिणामी स्ट्रॉबेरी उशिरानेच मार्केटमध्ये उपलब्ध होणार होती. परंतु आता झाडांना फळ लागण्याची सुरुवात आणि पुन्हा परतीच्या पावसाचा कहर सुरु झाल्याने महाबळेश्वर तालुक्यातील हजारो एकर क्षेत्रावरील स्ट्रोबेरीच्या शेतीचे नुकसान होणार आहे.स्ट्रॉबेरीचे उत्पादन व झालेला खर्च याचा ताळमेळ जुळवूने कठीण होणार तर आहेच. त्याच बरोबर उत्पादन घटणार असल्याने स्ट्रॉबेरीची चव घेणं अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच स्ट्रॉबेरीच दर गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.या वर्षी पावसाने सर्वच शेतीचे नुकसान केले असून या अगोदरच महाबळेश्वर तालुक्यतील वाटाणा, बटाटा, फरसबी हातातून गेलं आहे. आता स्ट्रॉबेरीच्या पिकाकडे डोळा लावून शेतकरी बसला होता. परंतु पावसाने व धुक्याने ते पीक सुद्धा हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणाच मोडला जाणार आहे.
शासनाने याकडे गांभिर्याने पाहून ओला दुष्काळ जाहीर करीत या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईसाठी एकवटण्याच्या तयारीत आहे.चव पडणार महाग...ऐकूण उत्पन्नाच्या ८० टक्के स्ट्रॉबेरी म्हाबळेश्वर तालुक्यात घेतली जाते. यावर्षी या पावसाच्या अस्मानी संकटामुळे त्यामध्ये मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाबळेश्वरमधील या लालबुंद रुचकर फळाची चव घेणं महाग होणार आहे.
सततच्या पावसाने आम्हा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरटेच मोडलं असून उत्पादन खर्चाचा मेळ बसविणेसुद्धा अवघड झालं आहे. शेतीचा सर्वच खर्च निघणे दुरापस्त झालं आहे. आता आर्थिक गणितच कोलमडून जाणार आहे.- महेंद्र पांगारे, पांगरीस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी