कऱ्हाड : काश्मीरमधील उरी येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मंगळवारी सायंकाळी कऱ्हाडात आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळी शेकडो नागरिकांनी कृष्णा घाटावर उपस्थिती लावली होती. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलित करीत नागरिक काहीकाळ नि:शब्द झाले होते.काश्मीरमधील उरी येथे लष्करी तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात जवान शहीद झाले त्यातील चार जवान महाराष्ट्रातील आहेत. त्यामध्ये साताऱ्यातील चंद्रकांत गलंडे, नाशिकचे संदीप ठोक, यवतमाळचे विकास कुडमेथे, अमरावतीचे विकास उईके यांचा समावेश आहे. शहीद झालेल्या जवानांना ठिकठिकाणी आदरांजली वाहण्यात येत असून, कऱ्हाड येथेही मंगळवारी नागरिकांनी स्वयंस्फूर्तिने एकत्र येत आदरांजली वाहिली. शहरातील प्रीतिसंगमावर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेकडो नागरिक जमा झाले. या नागरिकांच्या हातात मेणबत्त्या होत्या. एक-एक मेणबत्ती प्रज्वलित करीत शेकडो नागरिक सहभागी होत गेले. यामध्ये महिलांसह लहान मुलांचाही मोठा सहभाग होता. मेणबत्त्यांच्या प्रकाशात उपस्थित नागरिक, महिला व मुलांनी शांतता राखत आदरांजली वाहिली. विजय दिवस समारोह समितीच्या वतीने अध्यक्ष कर्नल संभाजी पाटील यांनी यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत काही वेळातच शेकडो नागरिक त्याठिकाणी जमले. संभाजीराव पाटील, अॅड. संभाजी मोहिते, अरुण जाधव, शंकराप्पा संसुद्दी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शहीद जवानांसाठी पेटल्या शेकडो मेणबत्त्या
By admin | Published: September 20, 2016 11:17 PM