मायणी : ‘कोरोनाच्या पार्श्वभूमी आणि सततचा लॉकडाऊन यामुळे गतवर्षीपासून अनेक वीज ग्राहकांनी बिले भरली नव्हती. लाखो रुपये बिल थकीत असल्याने १ मार्चपासून थकीत वीज बिल वसुली मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शेकडो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर सुमारे दहा लाख रुपयांहून अधिक थकीत रक्कम जमा झाली, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, गतवर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यश आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण व्यवहार शासनाकडून सुरू करण्यात आले. मात्र, याच काळात शासनाकडून थकीत वीज बिलाबाबत काही तरी तोडगा निघेल या आशेवर अनेक वीज ग्राहकांनी मार्च २०२० पासून वीज बिल भरणे थांबविले होते.
त्यामुळे वीज वितरण कंपनी प्रत्येक गावांमध्ये लाखो रुपयांची थकबाकी झाली होती. त्यामुळे वीज कंपनीने ग्राहकांना बिले भरण्यासंदर्भात फेब्रुवारी २०२१ मध्ये सूचना देण्यात आल्या होत्या.
वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांना हप्ते बांधून दिले होते. तरीही वीज बिले न भरल्याने वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेत उपकार्यकारी अभियंता राजकुमार कलशेट्टी, सहायक अभियंता विशाल नाटकर, व्यवस्थापक माधवी गायकवाड, उपव्यवस्थापक संतोष भोसले, राजेंद्र मोरे, संतोष शिंदे, भारत भोजने, ज्ञानेश्वर दोडके या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
चौकट-
सुटीदिवशीही भरणा सुरूच
जिल्हा मध्यवर्ती बँकेस शनिवार-रविवार सुटी असूनही वीज बिले भरण्यासाठी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून या दिवशीदेखील वीज बिले भरण्याची सोय करण्यात आली होती.
कोट
मायणीत रविवार (दि. १४) पर्यंत सुमारे शंभर ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यातील सुमारे पन्नास ते साठ टक्के वीज ग्राहकांनी थकीत वीज बिल भरल्यामुळे १ मार्चपासून दहा लाखांहून अधिक रुपयांची थकबाकी वीज वितरण कंपनीकडे जमा झाली आहे. वीज ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वीच थकबाकी भरणे गरजेचे आहे.
- राजकुमार कलशेट्टी