संजय पाटील
कऱ्हाड : शहरासह उपनगरांमध्ये सिमेंटचं जंगल विस्तारतय; पण या सिमेंटच्या जंगलापलिकडेही समृद्ध पक्षीवैभव पाहायला मिळतंय. विविध प्रकारचे शेकडो पक्षी कृष्णा आणि कोयना नदीकाठासह दलदलीच्या परिसरात वावरत आहेत. पक्षीतज्ज्ञांनी त्याबाबतची निरीक्षणे नोंदविली असून, कऱ्हाड परिसरात सुमारे दीडशे प्रकारच्या पक्ष्यांचा वावर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कऱ्हाड शहरात सध्या पक्ष्यांचा वावर कमी झाला आहे. यापूर्वी सोमवार पेठेतल्या एखाद्या पुरातन वाड्यात पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळायचा. मात्र, काळाच्या ओघात वाडे नामशेष झाले आणि पक्ष्यांचा चिवचिवाटही. शहराचा जसजसा विस्तार होत गेला, तसतसा पक्ष्यांचा थवा शहरापासून दुरावत गेला. काही वर्षांपूर्वी ज्याठिकाणी गर्द झाडी होती, अशा वाखाण परिसरातही सध्या अपार्टमेंट, रो हाऊसेस उभी राहिली आहेत. त्यामुळे तेथील पक्ष्यांची राहुटी कमी झाली; पण शहरात सिमेंटचे जंगल उभे राहिले असले तरी पक्ष्यांनी कऱ्हाड सोडलेलं नाही.
शहरापासून जवळच असलेल्या कृष्णा नदीकाठावर तसेच आसपासच्या पाणथळ जागेत पक्षीवैभव पाहायला मिळत आहे. दीडशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचा शहर परिसरात वावर असल्याचे पक्षीमित्र रोहन भाटे सांगतात. या स्थानिक पक्ष्यांबरोबरच काही ‘पाहुणे’ पक्षीही शहराच्या आसपास पाहायला मिळतात. वातावरणानुसार त्यांनी केलेले ते ‘स्थानिक स्थलांतर’ असते.
थंडीत पाहुण्या पक्ष्यांचेही आगमन
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे बार हेडेड गीज, रंगीत करकोचे, पांढरा आवाक, काळा आवाक, ग्लोसी आवाक, व्हिजल यासह अन्य काही पाहुणे पक्षी आपल्याला कऱ्हाडच्या आसपास पाहायला मिळतील. उन्हाळा सुरू होताच हे पक्षी पुन्हा इतरत्र स्थलांतरित होतात, असे रोहन भाटे यांनी सांगितले.
अनेक प्रजातीच्या पक्ष्यांचा वावर
ग्रेटीट
सनबर्ड
स्वर्गीय नर्तक
ब्राह्मणी घार
गव्हाणी घुबड
आवाक
सुतार
हळद्या
खंड्या
बेंबलर
शिक्रा
धनेश
कॉलर डोव्ह
काळा आयबीस
रोलर ऊर्फ नीळकंठ
गॉडव्हीट
रंगीत करकोचा
करकोचा
शेकाट्या
पांढरा आयबीस
पाणकावळा
भारद्वाज
कऱ्हाड परिसरात मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचा वावर पाहायला मिळतो. या पक्ष्यांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कृष्णा नदीकाठावर वेगवेगळ्या प्रजातींचे अनेक पक्षी आढळतात. स्थानिक पक्ष्यांबरोबरच काही स्थलांतरित पक्षीही हिवाळ्यात येथे दिसतात. - रोहन भाटे, पक्षीमित्र, मानद वन्यजीव रक्षक