सातारा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत महाश्रमदान झाले. गावोगावी राबविलेल्या या अभियानात शेकडो हात राबले तसेच हजारो तासांचेही श्रमदान झाले. तर यामध्ये १ हजार ४९३ ग्रामपंचायती सहभागी झाल्या होत्या. सर्वांच्या हाती झाडू, घमेले आणि खोरी दिसून आली. यातून शेकडो टन कचरा हद्दपार करण्यात आला.जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या संकल्पनेतून कचरा मुक्तीसाठी सोमवारी सकाळी ८ ते १२ हे चार तास स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यात या मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. १ हजार ४९३ ग्रामपंचायतीत मोहीम राबवली गेली.यासाठी रविवारपासूनच सर्वांनी जोरदार तयारी केली होती. तसेच कचरा संकलनासाठी नियोजन केले होते. ट्रॅक्टर, घंटागाड्या, घमेली, खोरी, झाडू आणि मनुष्यबळाचे पुरेपूर नियोजन प्रत्येक गावात झाले होते. प्रत्येक ग्रामपंचायतीत मोठ्या संख्येने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला बचत गट सदस्या, युवक मंडळाचे कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी यांनीही स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
गावागावात महा श्रमदान मोहिमेचे नेतृत्व गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी केले. रस्ते, गटारे, मोकळ्या जागा, बसस्थानक, पूल, शाळा आणि अंगणवाडी परिसर, ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य केंद्राचा परिसर, धार्मिकस्थळे, पर्यट स्थळे, नदी, नाले, तलाव, पानवट्याची ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. तर ग्रामपंचायतींनी मोठ्या प्रमाणावर कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. या मोहिमेमुळे गावेच्यागावे स्वच्छ झाली. स्वच्छतेमुळे झालेला बदल पाहून काही गावांनी आता महिन्यातून एकदा गावचा परिसर स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात महाश्रमदान झाले. यामध्ये हजारो हात राबले. यामुळे गावांतील कचरा हद्दपार झाला. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी झाले आहे. गावातून कचरा कायमचा दूर करण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सार्वजनिक स्वच्छतेचा उपक्रम राबवून स्वच्छतेमध्ये सातत्य ठेवावे. - ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी