मायणी : आषाढीवारीसाठी निघालेल्या बत्तीस शिराळा येथील वारकऱ्यांनी मायणी-पंढरपूर या ९४ किलोमीटर अंतराच्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो बियांची लागण करून कृतीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला आहे. भविष्यात दुष्काळी भागातील हा रस्ता हिरवाईनं फुलून जावा, अशी प्रार्थना त्यांनी विठुरायाकडे केली. विविध भागांतून शेकडो वारकरी पायी दिंड्या घेऊन पंढरपूरकडे रवाना होतात. यंदाही मायणी-पंढरपूर या मार्गावरून पायी दिंड्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीनं मार्गस्थ होत होत्या. त्यामध्ये बस्तीस शिराळा, ता. सांगली येथील पायी दिंडीतील वारकऱ्यांनी भक्तिमार्गाचे आचरण करतानाच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश दिला. या दिंडीतील वारकऱ्यांनी सुमारे ९४ किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारच्या बियांचे टोकण केले. उंबर फाउंडेशन पुणे व पांडुरंग माने गुरुजी यांच्या संयुक्त विद्यमाने बत्तीस शिराळा येथील पायी दिंडीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा बिया टोकल्या. या उपक्रमामुळे भक्तीला खऱ्या अर्थाने पर्यावरणाची जोड मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. या परिसरात चांगला पाऊस होऊन आम्ही लावलेल्या बियांचे वृक्षात रूपांतर व्हावे, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करणार असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)
पंढरीच्या वाटेवर शेकडो बियांची लागण
By admin | Published: July 25, 2015 11:50 PM