मायणी : मिरज-भिगवण राज्यमार्गाच्या (नियोजित राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सांगली सीमाभागावर उभारण्यात आलेल्या संयुक्त चेक पोस्टवर रोज शेकडो वाहनांची तपासणी होत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध निर्बंध व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हाबंदी आदेश जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाबंदी आदेश लागू केल्यापासून मिरज-भिगवण राज्यमार्गावर खटाव तालुक्यातील मायणी येथे चेक पोस्ट उभारण्यात आले आहे.
सातारा-सांगली जिल्ह्यांचा सीमाभाग असल्याने या ठिकाणी सातारा पोलीस दल व सांगली पोलीस दल यांच्यामार्फत संयुक्त तपास नाका (चेक पोस्ट) उभारण्यात आले आहे. या पोस्टवर रोज शेकडो वाहनांची तपासणी होत आहे. योग्य कारण व ई-पास असल्यानंतर पोलिसांमार्फत ही वाहने सोडून दिली जात आहेत. इतर व विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी होत असल्याने चेक पोस्ट सुरू झाल्यापासून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे.
(चौकट)
पोलीस विभागामार्फत वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या एम स्वॅप मशीनमुळे वाहनांचा जुना दंड एका मिनिटाच्या आत नंबर टाकल्यानंतर दिसत आहे. त्यामुळे जुना दंड वसूल होण्यासही या चेक पोस्टचा फायदा होत आहे, तसेच या मशीनला ऑनलाईन भरणा करण्याची सोय असल्याने पोलिसांचा थोडाफार त्रास कमी झाला आहे.
(चौकट)
सांगली जिल्ह्यातील विटा या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली अनेक हॉस्पिटल्स व मायणी या ठिकाणी कोविड सेंटर व मेडिकल कॉलेज अँड हाॅस्पिटल असल्याने या ठिकाणी उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनाही एक माणुसकी म्हणून पोलीस विभागाकडून थोडासा दिलासा दिला जात आहे. मात्र अनेकजण याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. अशांवर चाप लागणे गरजेचे आहे.
२८मायणी
मिरज-भिगवण राज्यमार्गावर सातारा-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. (छाया : संदीप कुंभार)