सातारा: सातारा पालिकेने हद्दवाढ भागातील मिळकतदारांना मालमत्ता कराची बिले दिली असून, करप्रणाली प्रकिया चुकीची आहे. त्यामुळे प्रशासनाने हद्दवाढीतील सर्व मिळकतींचा फेर सर्व्हे करावा, या मागणीसाठी ॲड. सचिन तिरोडकर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा पालिकेने चतुर्थ वार्षिक पाहणीचे काम पूर्ण करून हद्दवाढ भागातील मिळकतदारांना २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीकरिता मालमत्ताकराची बिले दिली आहेत. वास्तविक पालिकेने केलेले सर्व्हेक्षण सदोष असून, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
घरपट्टीच्या अनुषंगाने नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. पालिकेने दोन महिन्यांपूर्वी विशेष शिबिर घेऊन या तक्रारी नोंदवून घेतल्या. मात्र, या हरकतींवर कोणतीही सुनावणी झालेली नाही. या अन्यायकारक घरपट्टी आकारणीला स्थगिती देण्यात यावी, तसेच सर्व मिळकतींचा फेरसर्व्हे करावा, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. आंदोलनाचा इशारा देऊनही याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आम्हाला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या उपोषणाला शाहूनगर, गोडोली भागातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. निवेदनाची प्रत पोलिस अधीक्षक समीर शेख, सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना देण्यात आली आहे