संतोष कणसे --शाहूपुरी--वन्यप्राण्यांच्या शिकारीसंदर्भात कायदे कितीही कडक असले तरी आजही बिनदिक्कत सातारच्या जंगलात रानडुकरांची शिकार होत आहे. एवढेच नव्हे तर भरदिवसा त्याची रस्त्याकडेलाच विक्री केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी ‘लोकमत’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.सातारा शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या अंबेदरे रस्त्याकडेला काही परप्रांतीय शिकार केलेल्या रानडुकराची विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, रविवारीही याच भागात मारलेल्या रानडुकराची विक्री केल्याचे समोर आले आहे. वन कायद्याची भीती दाखविणाऱ्या वनविभागाच्या नाकावर टिच्चून काही परप्रांतीय कायदा बासनात बांधून वन्यप्राण्यांची शिकार करत आहेत. मात्र तरीही या प्रकाराची कुणकुणही वनविभागाला लागलेली नाही. वनक्षेत्रात होत असलेल्या शिकारीबाबत वनविभागाला काहीच माहिती कशी असू शकत नाही, याबाबत नागरिकांमधून शंका उपस्थित होत आहे.अंबेदरे परिसरात फिरून लोकांशी बोलून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून परराज्यातील टोळी येथील परिसरात वास्तव्यास आहे. आपल्या उपजीविकेसाठी ही टोळी जंगलात फिरून रानडुकरांची शिकार करते आणि गावोगावी जाऊन त्याची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. शिकारीतून महिन्यात लाखोंची कमाई---अंबेदरे रस्त्यावर सोमवारी सकाळी शिकार केलेल्या रानडुकराची विक्री सुरु होती. त्यावेळी टोळीतील पुरुष-महिला तिथे होत्या. त्यांना याबाबत विचारले असता एकाने सांगितले की, अनेक महिन्यांपासून आम्ही शिकार करत आहे. शिकार करून त्याची गावोगावी जाऊन विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. पंधरा ते सतरा किलो वजनाच्या एका रानडुकराच्या विक्रीतून तीन ते साडेतीन हजार रुपये मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. वन्यप्राण्यांच्या शिकारीतून लाखो रुपयांची कमाई करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.दिवसाआड शिकार!दिवसाआड एका तरी रानडुकराची शिकार आम्ही करतो, अशी माहिती टोळीतील एकाने दिली. जंगलात जाळी लावून सावज पकडायचे आणि कुऱ्हाडीने त्याला मारायचे, अशी त्यांच्या शिकारीची पद्धत आहे. पहाटे शिकार करून सकाळी त्याची विक्री केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. शिकाऱ्यांना ना कायद्याची भीती ना शिक्षेची...भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये कोणत्याही वन्यजीवाची शिकार करणे, हा गंभीर गुन्हा मानला जातो. गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, या वास्तवापासून ही शिकारी मंडळी जवळजवळ अनभिज्ञच आहे. वन्यप्राण्याचा जीव घेताना त्यांना ना कायद्याची भीती आहे ना शिक्षेची. म्हणूनच कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी इत्यंभूत माहिती दिली. वनविभागाच्या कारवाईकडे लक्षसातारा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धनवडेवाडी परिसरातील जंगलात रानडुकरांची शिकार होते अन् वनविभागाला त्याची कुणकुणही लागत नाही, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन वनविभाग काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिकार जंगलात.. मांसविक्री साताऱ्यात!
By admin | Published: October 26, 2015 11:14 PM