कऱ्हाड : राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरासह लांडोरची शिकार केल्याप्रकरणी एकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे. आटके, ता. कऱ्हाड येथे सोमवारी दुपारी वनविभागाने ही कारवाई केली. आरोपीने दोन मोरांसह सात लांडोर मारल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले असून त्याच्याकडे तपास सुरू आहे.
गोरख राजेंद्र शिंदे (वय ३२, सध्या रा. कृष्णा कारखाना परिसर, ता. कऱ्हाड, मुळ रा. ईटकुर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील आटके येथे मोराची शिकार केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीनुसार सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्यासह वनपाल ए. पी. सवाखंडे, बी. सी. कदम, रामदास घावटे, वनरक्षक सुनीता जाधव, रमेश जाधवर, उत्तम पांढरे, अश्विन पाटील, शंकर राठोड, जयवंत काळे यांनी आटकेतील कृष्णा नदीपात्रालगत असलेल्या खटकुळी, सावराई मळी नावच्या शिवारात छापा टाकला. त्यावेळी आरोपी गोरख शिंदे हा दोन मोर आणि सात लांडोरची शिकार करून त्यांना प्लास्टिकच्या पोत्यात भरून तेथून निघण्याच्या तयारीत होता. वनविभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
तसेच त्याच्याकडून शिकार केलेले मोर, लांडोर, एक दुचाकी व मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे. फासकीच्या सहाय्याने त्याने ही शिकार केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आरोपीवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे. सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे तपास करीत आहेत.
शिकारीची माहिती कळवा!
मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याची शिकार करणाऱ्यास सात वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. तसेच इतर वन्यप्राण्यांची शिकार करणेही कायद्याने गुन्हा आहे. नागरिकांनी अशा शिकारींबाबत वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी केले आहे.