लोकमत न्यूज नेटवर्कऔंध : जिल्ह्यातील पवारवाडीत शनिवार, दि. २० आणि रविवार, दि. २१ मे रोजी राष्ट्र सेवा दलातल्या सावित्रीच्या लेकींसमवेत राज्यभरातून आलेल्या शेकडो राष्ट्र सेवा दल सैनिकांनी श्रमदान केले. श्रमदान करणाऱ्यांमध्ये तरुणींची संख्या लक्षणीय होती.मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नाशिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर अशा राज्यभरातील सेवा दल शाखांमधून कार्यकर्ते श्रमदानासाठी पवारवाडीत दाखल झाले होते. झाडे लावण्यासाठी शेकडो खड्डे त्यांनी खोदले. येत्या पावसाळ्यात तिथं झाडे लावली जाणार आहेत. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी सीड बँकेच्या माध्यमातून शाळा-शाळांमधून गोळा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या. राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी गावकरी मोकळा संवाद करताना दिसत होते. यापुढे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचा संकल्प या गावचे सरपंच राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविला. जलसंधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण या निमित्ताने झाले ही या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेची आणि ‘राष्ट्र सेवा दल’ सारख्या संघटनेचे यश आहे. या शिबिरात श्रमदानाबरोबरच ‘लेक लाडकी’ अभियानाच्या वर्षा देशपांडे, शाहीर कैलास जाधव, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य, तरुण कीर्तनकार सचिन पवार, पवारवाडीचे सरपंच राजेंद्र पवार, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन माने, पत्रकार अश्विनी सातव, राजा भाऊ अवसक, प्रा. रामदास निकम यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. देशामध्ये धर्माच्या, जातीच्या नावावर जे राजकारण सुरू आहे त्याच्या विरोधात श्रमदानाबरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची गरज राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी व्यक्त केली. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, संजय रेंदाळकर, सचिव नचिकेत कोळपकर, विद्याधर ठाकूर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत डिग्रजे, छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता ढगे, सुनील स्वामी, दामिनी पवार, उषा कोष्टी, वैशाली हुबळे, शोभा स्वामी, श्वेता दिब्रिटो आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
पवारवाडीत तुफान आलंया... सपान सजलंया !
By admin | Published: May 22, 2017 11:19 PM