सातारा : तोक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यातील चार तालुक्यात फळबागा अन् भाजीपाल्याचे किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात दोन दिवस तोक्ते चक्रीवादळाचा प्रभाव होता. तसेच वळवाचा पाऊसही पडला. विशेष करून पूर्व भागापेक्षा पश्चिमेकडे वादळ आणि पावसाचा जोर अधिक राहिला. सातारा, पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, जावळी या तालुक्यात चांगला पाऊस पडला. तसेच वारेही जोरदार वाहत होते.
तोक्ते चक्रीवादळ आणि पावसामुळे पाटण, कऱ्हाड, कोरेगाव आणि महाबळेश्वर या तालुक्यात किरकोळ स्वरूपात शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी फळबागा आणि भाजीपाल्याचे नुकसान झाले. महाबळेश्वर तालुक्यात नजर अंदाजे ४ हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये फराशीचे नुकसान आहे. मेटगुताड, क्षेत्र महाबळेश्वर, नाकिंदा, अवकाळी, गुरेघर, बोंडारवाडी येथे हे नुकसान दिसून आले. महाबळेश्वर तालुक्यात बाधित शेतकऱ्यांची संख्या ५५ इतकी आहे. तर इतर तालुक्यात काही ठिकाणी शेडनेट, आंबाबागेचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात शेती नुकसान झालेल्या भाजीपाला आणि बागांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागात शेती नुकसान झाले नसल्याचे दिसून आले आहे.
.........................................................................