लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सैदापूर ते लिंब या मार्गावर असणाऱ्या एका मंगल कार्यालयाजवळ भरधाव चारचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झाले. या धडकेत दुचाकीचेही मोठे नुकसान झाले असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चारचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. शुभम इंदलकर असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वैभव गुलाबराव फाळके (वय २८, रा. सैदापूर, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा भाऊ अमर गुलाबराव फाळके आणि त्यांची पत्नी शीतल अमर फाळके हे दोघेजण वाई तालुक्यातील अमृतवाडी येथून दुचाकीने (एमएच ११-सीए ०६३१) सातारकडे येत होते. सैदापूर ते लिंब खिंड मार्गावर असणाऱ्या हॉटेल ग्रीन चिलीसमोरील विठ्ठल मंगलम कार्यालयाजवळ आले असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या एका कार (एमएच १२ - जीएन १२४४) ने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत अमर फाळके आणि त्यांच्या पत्नी शीतल फाळके हे दोघे जखमी झाले. या धडकेत दुचाकीचेही २५ हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वैभव फाळके यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी शुभम उध्दव इंदलकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे करत आहेत.