सातारा : लग्न झाल्यानंतर दुसर्याच वर्षी पत्नी सुनिता राजू शिंदे (वय-२८) हिला पेटवून देवून तिचा खून केल्याप्रकरणी राजेश उर्फ राजू गणपत शिंदे (३०, रा. खांबील पोकळे ता. महाबळेश्वर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना २०१७ मध्ये घडली होती.याबाबत खटल्याची पार्श्वभूमी अशी, राजू शिंदे व सुनिता शिंदे यांचा विवाह झाल्यानंतर राजू पत्नीला वारंवार मानसिक त्रास देत होता. यातूनच शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण देखील करत होता. घरगुती कारणातून चिडून जावून राजू शिंदे याने दि. ९ जानेवारी २०१७ रोजी पत्नी सुनिताच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुनिताला उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. ती ९० टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. यादरम्यान पोलिसांनी तिचा जबाब देखील घेण्यात होता. दरम्यान, उपचार सुरुअसताना ११ जानेवारीला सुनिताचा मृत्यू झाला.याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात पती राजू शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. तत्कानीन सहायक पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. आर्शीवाद कुलकर्णी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. मृत्यूपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच शास्त्रोक्त व भौतिक पुरावा या खटल्यात महत्वूपर्ण ठरला. न्यायाधिशांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी राजू शिंदे याला जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. सातारा जिल्हा न्यायालयातील प्रॉसिक्युशन स्कॉडच्या पोलिसांनी यावेळी सहकार्य केले.
पत्नीला पेटवून तिचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा; घरगुती वादातून कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 8:14 PM