सातारा : ‘माझी कुणावर कधीच दहशत नव्हती. माझ्या व्यक्तिमत्त्वाविषयी जनमाणसांमध्ये आदरयुक्त दबदबा असल्याने आदरयुक्त दहशत आहे. ही माझी असलेली आदरयुक्त दहशत मोडीत काढण्यात आल्याचे कोण बडबडत असेल तर, ‘आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा’ असे त्यांचे म्हणणे दिसत आहे. माझी आदरयुक्त इमेज संपविण्यासाठी त्यांना हाच नव्हे तर दुसरा जन्म सुद्धा पुरा पडणार नाही,’ असा उपहासात्मक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये सुरू असल्याचे स्पष्ट केले. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उदयनराजे यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या वाहनावर नाहीच, परंतु माझ्याबरोबर मागे राहिलेल्या वाहनांवर दगडं पडली म्हणजे कुणाची दहशत संपली असा निष्कर्ष केवळ वेडपट व्यक्तीच काढू शकते. तसेच माझी दहशत मोडीत काढली. मला सातारा तालुक्यातच अडकवून ठेवले असले काहीतरी कुणीतरी परवा बडबडले. असे चिथावणीखोर वक्तव्य करून १९९९ ची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न चालला आहे, असे एकंदरीत मत जनतेने माझ्याशी व्यक्त केलेले आहे. मात्र, माझ्या मनामध्ये कुणाविषयी कधीच आकस राहत नाही. त्यांचे मात्र तसे नाही. ते संस्था आणि बँका बडवून उजळ माथा असल्याचे भासवतात. त्यांना फिरता येते तसे मला कधीच जमणार नाही आणि ते माझ्या रक्तातही नाही. कारखाना आणि संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला आर्थिक पिळवणूक करण्यासाठी दहशतीखाली ठेवणे, खूनशी वृत्ती ठेवून केसाने गळा कापणे असे प्रकार त्यांनाच शोभून दिसतात. असल्या वैशिष्ट्यांमुळेच त्यांना कुणीतरी गवती साप म्हणून हिणवले होते. माझ्या दृष्टीने ते तर फक्त भोंदूबाबा आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलाकडे मला लक्ष देण्याची गरज नाही.’ सातारा तालुक्यात आम्हाला मिळालेली मते पाहता कुणाचा पाय खोलात चालला आहे हे सहज लक्षात येत आहे असे सांगून उदयनराजे म्हणाले, ‘तालुक्यामध्ये त्यांच्याविरोधात ९७ हजार मते पडलेली आहेत. तर बाजूने ८१ हजार मते आहेत. हा १६ हजार मताधिक्याचा फरक त्यांना निश्चितच विचार करायला लावणारा आहे. तरी सुद्धा कुणी स्वत:ची पाठ थोपटवून घेत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तथापि, अशा वस्तुस्थितीवरून त्यांना फक्त सत्तेचा मेवा हवा असल्याचे स्पष्ट होते. मला सत्तेचा मेवा नको तर जनतेची सेवा करायची आहे. अशी सेवा करताना, जनतेची कुठेही अडवणूक होत नाही. उलट जो जनसेवेची अडवणूक करतो, त्याला अडविण्याचा माझा शिरस्ता आहे.’ (प्रतिनिधी)
जनतेमध्ये माझा आदरयुक्त असा दबदबा
By admin | Published: March 09, 2017 11:11 PM