सातारा : “एखादा माणूस काम करत असेल तर त्याला करू द्या. उगाच उठसूट खंडणीचे आरोप करू नका. मी ईडी चौकशीसाठी केव्हाही तयार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही समोर या,” असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
उपमुख्यमंत्री पवार पाच दिवसांपूर्वी माण तालुक्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकप्रतिनधींमुळे सातारा एमआडीसीचा विकास खुंटला’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा खा. उदयनराजे यांनी शुक्रवारी आपल्या शैलीत समाचार घेतला. ते म्हणाले, “पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या शहरात एमआयडीसीला परवानगी दिली जात होती. त्यावेळी ज्यांच्याकडे सत्ता होती. ज्यांच्याकडे मंत्रिपद होते, त्यांनी आपली जबाबदारी का पार पाडली नाही? त्यावेळी सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी का विकसित झाली नाही. त्यावेळच्या तत्कालीन आमदार, खासदारांनी एमआयडीसीकडे लक्ष का दिले नाही?”