सातारा: अलीकडे मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले असून, अशाच एका छेडछाडीच्या प्रकाराने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या आहेत. ‘मला गर्लफ्रेंड नाही. तू शोधून दे नाहीतर तू बन,’ अशी अजब मागणी एका तरूणाने अल्पवयीन मुलीकडे केली आहे. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या मुलीने ढेबेवाडी, ता. पाटण पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित तरूणाच्याविरोधात तक्रार दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलगी आणि तरूण पाटण तालुक्यातील एकाच गावात वास्तव्यास आहेत. त्यामुळे दोघांची तोंडओळख आहे. यातून संबंधित मुलाने सोशल मीडियावरून त्या मुलीकडे अजब मागणी केली. ‘मलागर्लफ्रेंड नाही. मला शोधून दे नाहीतर तू बन. तुझे काही डिटेल्स माझ्याकडे आहेत. तुझा फोन हॅक करायला सांगितला आहे,’ अशी धमकी देऊन पीडित मुलीला त्याने ब्लॅकमेल केले.
या प्रकारानंतर भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने हाप्रकार तिच्या घरातल्यांना सांगितला. त्यानंतर घरातल्यांनी मुलीला घेऊन थेट ढेबेवाडी पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या तक्रारीवरून संबंधित तरूणावर विनयभंगसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत संबंधित संशयित आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली नव्हती.