सातारा : साखर आणि गूळ दोन्हीही गोडच. पण, आता गुळाने दरातही साखरेवर मात केली आहे. होलसेल व किरकोळ बाजारातही गुळाला अधिक दर मिळत आहे. कोरोनामुळे तर सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असून किलोचा दर ६० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
जिल्ह्यातील काही भागात गुऱ्हाळ घरे आहेत. दरवर्षी दिवाळीनंतर या गुऱ्हाळघरांची घरघर सुरू होते. या गुऱ्हाळघरातील गूळ जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत जातो. तसेच बाहेरही पाठविण्यात येतो. गुळालाही चांगली मागणी असते. पूर्वी गरिबांच्या घरी गूळ, श्रीमंताच्या दारी साखर असे म्हटले जात होते. पण, आता गूळ साखरपेक्षा अधिक पसंदी घेताना दिसून येत आहे.
मागील काही वर्षांचा विचार करता साखरेपेक्षा गुळानेच अधिक भाव खाल्ला असल्याचे दिसून येत आहे. साखरेच्या दरात थोडा फार चढउतार होतो. पण, गुळाला मागणी कायम असल्याने दरात सुधारणाच होत गेली आहे. त्यातच आता सेंद्रिय गूळही बाजारपेठेत येतो. या गुळाला दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय गुळाचा दर ६० रुपये किलोपर्यंत गेला आहे.
कोरोना काळात सेंद्रिय गुळाला मागणी आहे. कारण, आरोग्यासाठी हा गूळ महत्त्वपूर्ण ठरत आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी गुळाचा चहाही मिळत आहे. लोकही आवडीने गुळाचा चहा पितात. त्यामुळेही गुळाला मागणी कायम असल्याचे दिसून येत आहे.
चौकट :
असा वाढला गुळाचा भाव
वर्ष साखर गूळ
२००० १४ १४
२००५ १८ १६
२०१० ३० २८
२०१५ ३२ ३०
२०२० ३५ ४०
२०२१ ३५ ५०
.....................................
आता गुळाचा चहा बनला स्टेटस्
- सध्या साखरेच्या चहापेक्षा गुळाच्या चहाला अधिक पसंदी मिळत आहे. पूर्वी साखर परवडत नव्हती म्हणून गुळाचा चहा केला जात होता. आता गुळाचा चहा प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याचबरोबर गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
- गुळात साखरच्या तुलनेत भरपूर जीवनसत्त्वे असतात. ही जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
- गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. शरीररात रक्ताची कमतरता असेल तर मग गुळाचा चहा ही समस्या दूर करतो, असे म्हटले जाते.
........................................................
गावात मात्र साखरच...
ग्रामीण भागात साखरेचा चहा पिणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे साखरेलाच पसंती मिळते. तर गुळाचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी आहे. तरीही अलीकडील काळात गुळाचा वापर होताना दिसून येत आहे.
- प्रभाकर पाटील, दुकानदार
......................
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी...
मागील काही वर्षांचा विचार करता गुळाला मागणी वाढत चालली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात गुळाला पसंती आहे. याला कारण म्हणजे आरोग्यासाठी नागरिक गूळ खरेदी करतात. साखरेचे प्रमाण कमी होत आहे.
- संजय भोईटे, दुकानदार
...........................
साखरेच्या तुलनेत गुळाला मागणी आहे. त्यामुळे गुळाचे दर वाढत चालले आहेत. त्यातच लोकांकडून सेंद्रिय गुळाला मागणी अधिक असते. कारण, हा गूळ आरोग्यासाठी चांगला असतो.
- प्रवीण पवार, दुकानदार
......................................
साखरेपक्षा गूळ कधीही चांगला ठरतो. चांगल्या आरोग्यासाठी गुळाचा वापर करणे महत्त्वाचे असते. कारण, गुळातून अधिक चांगले घटक मिळतात. यामुळे गुळाचा आहारात वापर करणे हिताचे ठरते, असे आहार तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
......................................................................