सातारा : ‘मी सत्तेसाठी कोणत्याच पक्षात जात नाही. मी आता राजीनामा दिला तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल. गेल्या निवडणुकीत माझ्या हिशोबाने खरं तर माझा पराभव झालाय. त्यामुळे निर्णय तुम्ही घ्या,’ असा भाजप प्रवेशाचा चेंटू उदयनराजेंनी कार्यकर्त्यांच्या कोर्टात टाकला.साताऱ्यातील एका रिसॉर्टमध्ये खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात समर्थकांची बैठक रविवारी दुपारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार उदयनराजेंनी कोणत्या पक्षात जायचे, हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असून, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु त्यांनी विकासासाठी भाजप पक्षामध्येच प्रवेश करावा, असा ठरावही कार्यकर्त्यांकडून बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांमधून मते व्यक्त करण्यात आली. नगरसेवक निशांत पाटील म्हणाले, ‘खासदार उदयनराजेेंचा भाजप प्रवेश आठ-दहा लोकांना सोबत घेऊन नको, आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत तितके कार्यकर्ते सोबत घेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश करावा.’खासदार उदयनराजे हाच आमचा पक्ष असून, ते ज्या पक्षात जातील आणि ते जे काम सांगतील, ते आम्ही एकदिलाने करण्यास तयार आहोत, असेही अनेक कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले. सध्या विकास व्हायचा असेल तर उदयनराजेंनी भाजपमध्ये जाणे योग्य ठरेल, असे जवळपास सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.दरम्यान, कार्यकर्त्यांची बैठक संपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले त्या ठिकाणी आले. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘सत्तेत असताना अनेकदा गळचेपी झाली. मी होतो म्हणून टिकलो ते केवळ कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे. माझ्याबाबतीत आडवाआडवीचे राजकारण झाले आहे. एवढी वर्षे तुमच्यासोबत होतो. काय मिळाले? ईव्हीएम मशीनबाबत मी एकटाच बोलत होतो. बाकीचे मात्र, गप्प बसले होते. काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये ताळमेळ नाही. तत्पूर्वी उदयनराजेंनी नोटाबंदी, जीएसटीमुळे देशाची स्थिती कशी बिघडली, जागतिक मंदी नसतानाही देशाची अवस्था कशी झाली? यावर भाष्य केले.दरम्यान, येत्या दोन दिवसांत व्यापक बैठक बोलविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुख्यमंत्र्यांचा आज मला फोन आल्यावर बघूया..खासदार उदयनराजेंनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ‘भाजप प्रवेशाचा निर्णय तुम्ही घ्या,’ असे सांगितले. त्यावर कार्यकर्ते म्हणाले, ‘आमचा निर्णय झालाय. तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे.’ हे ऐकून उदयनराजे म्हणाले, ‘ठिक आहे, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला फोन करणार आहेत. बघूया,’ असे म्हणत ते जागेवरून उठले. त्यानंतर उदयनराजे तेथून निघून गेले.
लोकसभेलाच माझा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 11:41 PM