कऱ्हाड पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत दोन वेळा देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यातूनच ‘आय लव्ह कऱ्हाड’ या सेल्फी पॉईंटची उभारणी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाक्यावर करण्यात आली होती. मात्र, याकडे काही दिवसांनी पालिकेचे दुर्लक्ष झाल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सेल्फी पॉईंटच्या अक्षरांवर मोठ्या प्रमाणात बसल्याने सेल्फी पॉईंटच काहीसा विद्रूप झाल्यासारखा दिसत होता. त्यामुळे सोशल मीडियावर गाजलेल्या ‘आय लव्ह कऱ्हाड’ या ‘सेल्फी पॉईंट’ला अवकळा आली होती. ही प्रतिकृती अनेक महिने निव्वळ धूळखात पडली होती. शहराचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी उभारलेल्या या प्रतिकृतीची निगा राखण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले होते. मात्र, पालिकेने पुन्हा एकदा नियमितपणे हा परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. सेल्फी पॉईंटवरील धुरळा हटवून त्याची नव्याने रंगरंगोट करण्यात आली आहे. तसेच परिसरातील गवत काढून स्वच्छता करण्यात आली आहे. त्यामुळे सेल्फी पॉईंटला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होत आहे.
याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करून हा परिसर असाच स्वच्छ ठेवण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे.
फोटो : ०१केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडात कोल्हापूर नाक्यावर असणाऱ्या ‘आय लव्ह कऱ्हाड’ या ‘सेल्फी पॉईंट’ची रंगरंगोटी करून स्वच्छता करण्यात आली आहे.