सातारा : भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साताऱ्यात भेट घेतली. त्यांच्या देहबोलीवरून ते शरीराने भाजपामध्ये असले तरी मनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्यासारखे वाटत होते. यावर शिवेंद्रराजेंनी सावध प्रतिक्रिया दिली असली तरी अजित पवार यांनी मात्र कोणाच्या मनात सध्या काय चाललंय कसं ओळखावं अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले साता-याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. सध्या शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपाचे आमदार आहेत. मात्र, अजूनही त्यांच्या मनातून राष्ट्रवादी काँग्रेस बाबतचे प्रेम कमी झालेले नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील जेव्हा शरद पवार आणि शिवेंद्रसिंहराजे यांची भेट झाली होती त्यावेळी मकरंद पाटील यांनी मध्यस्थी करत शिवेंद्र बाबांना पुन्हा आपल्याकडे घ्या अशा प्रकारची आर्जव केली होती. आज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजित पवार यांची घेतलेली भेट राजकीय भेट होती की शहरातील सर्वसामान्य प्रश्नांसंदर्भात भेट होती याबद्दल साता-यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही कधीही विकास कामांबाबत अडथळा आणत नाहीत असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न त्याबरोबरच एमआयडीसी, अर्धवट राहिलेले कास धरणाचे काम आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात निवेदन हे अजित पवार त्यांनी दिले असल्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
मात्र, दरम्यानच्या काळात अजित पवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली असू शकते हे देखील नाकारता येत नाही. त्यामुळेच अजित पवार यांनी आमची भेट झाली चर्चाही झाली. पण त्यांच्या मनात काय चालू हे कसे सांगणार असे सूचक वक्तव्य करून राजकीय चर्चा झालेली नाही असे म्हणणेही सोयीस्करपणे टाळले. या भेटीची सर्वांमध्येच चर्चा सुरू होती. पण, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे.
आणखी बातम्या...
"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका
'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! रुग्णांची संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचा डोंबिवलीत मोर्चा, पण फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा