सातारा : अजित पवार यांनाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष करण्यासाठीच खा. शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, अजित पवार यांनीच नकार दिल्याचा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला होता. याबाबत सातारा दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मौन बाळगत त्या बैठकीला उपस्थितच नसल्याचे सांगितले. दरम्यान, संजय राऊत यांचा समाचार घेताना देवाला देवाच्याच जागी ठेऊया, असा सल्ला दिला.सातारा येथे शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या विविध बैठका व कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. त्यावेळी केबीपी कॉलेज येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी भाजपने फक्त प्रभू रामचंद्र यांच्याबाबत वक्तव्य केले. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले, संजय राऊत हे खूप मोठे नेते आहेत. ते वारंवार वेगवेगळी विधान करत असतात, सल्ले देत असतात. प्रभू रामचंद्र हे सर्वांच्या अस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्याच जागी ठेऊया, असा सल्ला दिला.अजित पवार यांनाच अध्यक्ष करण्यासाठीच खा. शरद पवारांनी बैठक बोलावली होती. मात्र, तेव्हा अध्यक्षपद नको असं अजितदादा म्हणाले होते, असा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला. यावर दिलीप वळसे-पाटील यांनी बोलणं टाळत माझ्यासमोर अशी चर्चा झाली नव्हती. मला त्याबाबत माहित नाही, अस सांगत या प्रश्नावर बगल दिली.पिंपरी चिंचवडमधील माजी महापौर संजोत वाघेरे यांनी उद्धव ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे. याबाबत वळसे पाटील म्हणले, संजोग यांना या पूर्वी संधी दिली होती. त्याठिकाणी आता दुसरे नेतृत्व तयार झाले आहे. कदाचित आपलं नाव यादीत येणार नाही हे कळल्यामुळंच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा.जिगाव प्रकल्पासाठी पाईप खरेदी करण्याची गरज नसतांना अजित पवार पाटबंधारे मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांची पाईप खरेदी केली, निवडणूकीपुर्वी ३३०० कोटीचं टेंडर ठेकेदारांना देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत अजित पवार हेच योग्य उत्तर देतील, मी उत्तर देऊ शकत नाही असे दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांनी बोलावलेल्या 'त्या' बैठकीला मी नव्हतो - दिलीप वळसे-पाटील
By दीपक देशमुख | Published: December 30, 2023 5:54 PM