सातारा : 'महायुतीत तीन पक्षाचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्याला मिळावी असे वाटते आणि ते चुकीचे नाही. आपल्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. सध्या इतकंच सांगतो की मी काही संन्यास घेणार नाही. माझ्याजवळ बसचे तिकीट आहे ट्रेनचे आहे आणि विमानाचेही तिकीट आहे,' असे सूचक वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.सातारा पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यानाचे लोकार्पण शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकसभा संयोजक सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, विनीत पाटील आदी उपस्थित होते. उदयनराजे भोसले यांनी या स्मृतिस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक दिवसांपासून सातारा लोकसभा मतदारसंघ चर्चेचा ठरला आहे. या मतदारसंघात आपल्याला तिकीट मिळणार का? याबाबत छेडले असता उदयनराजे म्हणाले, 'माझ्याजवळ बसचे तिकीट आहे. ट्रेनचे तिकीट आहे. विमानाचे तिकीट आहे. सर्व तिकीट आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत वेळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल.
वेळ आल्यानंतर बघू उमेदवारीची मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि माझ्या नाराजीचे बोलाल तर मी काही संन्यास घेतलेला नाही. भाजपकडून आपल्याला संधी मिळणार का? या प्रश्नाला बगल देत 'वेळ आल्यानंतर बघू' असे ते म्हणाले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत उदयनराजे यांनी प्रथमच सूचक वक्तव्य केल्याने राजकीय धुरीणांच्या मात्र भुवया उंचावल्या आहेत.