बनगरवाडीत रस्त्याचे भूमिपूजन :
लोकमत न्यूज नेटवर्क
वरकुटे-मलवडी : ‘माणसारख्या कायम दुष्काळी भागात पाणी आलेच पाहिजे. शेती पिकून इथला शेतकरी सधन झाला पाहिजे. माझ्या माणसांसाठी मी पर्मनंटमंत्री म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे,’ असे प्रतिपादन माजी दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी केले.
बनगरवाडी (वरकुटे मलवडी, ता. माण) येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच याप्रसंगी मंत्री जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जानकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९८ झाडे लावण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी उपसभापती दादासाहेब शिंगाडे, वरकुटे-मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, बनगरवाडीच्या सरपंच रंजना बनगर, काळचाैंडीचे भाऊसाहेब माने, विक्रम शिंगाडे, खंडेराव जगताप, वैभव शिंगाडे, ॲड. विलास चव्हाण, कुंडलिक यादव, सचिन होनमाने, तानाजीशेठ बनगर, सदाशिव बनगर, सुनील थोरात, भागवत अनुसे आदी मान्यवर उपास्थित होते.
माजी मंत्री जानकर म्हणाले की, ‘वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. माझ्या आईच्या स्मृती कायम जागृत ठेवण्यासाठी हा उपक्रम राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात यावा. माण तालुका रत्नांची खाण आहे. इथल्या तरुणांनी आयएएस, आयपीएस झाले पाहिजे. गावागावांतील हेवेदावे बाजूला सारून तरुणांना जिल्हािधकारी, आयुक्तांसारखे अधिकारी घडविण्याचे काम झाले पाहिजे. शेती करणार असाल तर सोबत जोडधंद्याची निवड करा. बनगरवाडीत क्रीडा संकुल उभारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.’
अनिल देसाई म्हणाले, ‘स्वतःच्या मातोश्रींची रक्षा झाडांना घालून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आदर्श महादेव जानकर यांनी घालून दिला आहे. तसेच त्यांनी वृक्षारोपण करण्याचा जो संकल्प केला आहे, तो अनुकरणीय आहे. या भागात टेंभूचे पाणी आल्यामुळे येथील अनेक गावे ही कायमची टॅंकरमुक्त झाली आहेत. अनेक वर्षे रखडलेले रस्त्याचे काम मार्गी लागल्याचे समाधान आहे. या भागात शेतीला पाणी आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. जर सरकारने दोन महिन्यांत पाणी नाही दिले तर पुन्हा एकदा पाण्यासाठी जनआंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. यावेळी माजी सरपंच भारत अनुसे, विक्रम शिंगाडे, बापूराव बनगर, सचिन होनमाने, सदाशिव बनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत अनुसे यांनी केले, तर आभार बापूराव बनगर यांनी मानले.
फोटो : बनगरवाडी, ता. माण येथील वृक्षारोपण कार्यक्रमात माजी मंत्री महादेव जानकर, अनिल देसाई, बाळकृष्ण जगताप, विक्रम शिंगाडे, भारत अनुसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.