सातारा : राज्यात सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने काहूर माजवले आहे. सूर्य दिवसभर आग ओकत असून, जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर गेला आहे. पोटाची खळगी भागवण्यासाठी वरून रखरखत्या उन्हाचा तडाखा व खालून पायांना चटका तशातच पायात जीर्ण झालेली चप्पल, अशा परिस्थितीत दुसऱ्याला थंडावा देणाऱ्या फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्यांना कर्ण फाउंडेशनने प्रेमाचा थंडावा दिला आहे.कर्ण फाऊंडेशनने या आईस्क्रीम विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून टोपी, घामापासून बचावासाठी नॅपकीन व थंड पाण्याची पिशवी असे कीट दिले आहे. याचे वितरण सातारा जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रवीण पाटील म्हणाले, ‘कर्ण फाउंडेशनने केलेली कामे ही ज्या-त्या वेळची गरज ओळखून केलेली असून, आजचा हा उपक्रम म्हणजे अत्यंत स्तुत्य व हृदयाला भिडणारा आहे. समाजातील या दुर्लक्षित लोकांशी भावनिक-जवळीक साधून कृतज्ञ भावनेने कर्ण फाउंडेशनने केलेली मदत अतिशय कौतुकास्पद आहे.’ कर्ण फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे म्हणाले, ‘उन्हाची वाढलेली तीव्रता व त्यामध्ये कर्णने फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्यांना दिलेला थंड गारवा हा आमच्या सर्वांच्याच मनाला सुखद आनंद देऊन गेला आहे.’ असे म्हणून त्यांनी संस्थेच्या सर्व उपक्रमांचा आढावा घेतला.कार्यक्रमास कुमार लोखंडे, दत्तात्रय भोकरे, राजन थोरात, हेमंत जोशी, गिरीश यादव, अविनाश कोल्हापुरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन् ते गहिवरले..उन्हातान्हात आईस्क्रीम विकल्याशिवाय प्रपंचा कसा चालणार, असा प्रश्न विक्रेत्यांसमोर असतो. कर्ण फाउंडेशनने याची दखल घेऊन त्यांच्या डोक्यावर मायेची सावली दिली. त्यामुळे या विक्रेत्यांना गहिवरून आले.
आईस्क्रीम विक्रेत्यांना माणुसकीचा ‘गारवा’
By admin | Published: May 04, 2016 11:03 PM