सातारा : अजिंक्यतारा साखर कारखाना अडचणींना सामोरे जाऊनही ऊस उत्पादकांना एफआरपीनुसार बिल वेळेत अदा करीत आहे, ही बाब खरोखरच कौतुकास्पद आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यारूपाने खंबीर नेतृत्व लाभल्यामुळेच हा कारखाना अनंत अडचणींवर मात करून आर्थिकदृष्टया सक्षम होत चाललेला आहे, ही बाब आदर्शवत अशीच आहे, असे गौरवोद्गार राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.
कारखान्याला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हाईस चेअरमन विश्वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई आदी उपस्थित होते.
आयुक्त गायकवाड म्हणाले, राज्यात एक आदर्श कारखाना म्हणून नावारूपास आलेल्या अजिंक्यतारा कारखान्याचा या गळीत हंगामातील साखर उतारा जिल्ह्यात उच्चतम आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यारूपाने योग्य नेतृत्व लाभल्यामुळेच कारखाना प्रगतीपथावर आहे. हा कारखाना एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांचे ऊस बिल वेळेत अदा करीत असून, दर दहा दिवसांचे ऊस बिल अदा करणारा महाराष्ट्रातील अजिंक्यतारा हा एकमेव कारखाना आहे. कारखान्याचे कामकाज आणखी प्रगतिपथावर कसे नेता येईल याबाबत गायकवाड यांनी मार्गदर्शन करून, तशा सूचना खातेप्रमुख, अधिकाऱ्यांना दिल्या.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊनच कारखान्याचे कामकाज चालविले जाते. त्यामुळे कारखाना प्रगतिपथावर नेण्यास ऊस उत्पादक सभासद, बिगरसभासद यांचेही बहुमोल सहकार्य लाभत असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. तसेच संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण असल्यामुळेच कारखाना प्रगतिपथावर नेण्यास वाव मिळत आहे, असेही ते म्हणाले.
फोटो : २५ अजिंक्यतारा
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी अजिंक्यतारा कारखान्याला गुरुवारी सदिच्छा भेट दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांचे स्वागत केले.