कऱ्हाड : संस्कारक्षम विद्यार्थी घडवत असताना शिक्षकांची आदर्श मूल्ये मुलांच्या मनावर कोरली जातात. त्यातून विद्यार्थ्याचा शिक्षकही आदर्श बनत जातो. असे शिक्षक समाजासाठी आदर्श ठरतात, असे मत इतिहास तज्ज्ञ प्रा. के. एन. देसाई यांनी व्यक्त केले.
काले (ता. कऱ्हाड) येथील शिवाजीनगर प्राथमिक शाळेचे शिक्षक संभाजी राजाराम यादव यांना यंदाचा कऱ्हाड पंचायत समिती यांच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा प्रेरणा प्रतिष्ठान यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरेश तेली, माणिक यादव, जालिंदर पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ व रोप देऊन त्यांना गौरवण्यात आले.
प्रा. देसाई म्हणाले, संभाजी यादव सरांचे आदर्शपण त्यांच्या कामातून दिसून येते. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यावर योग्य संस्कार झाले पाहिजेत. यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी सर्व कामे प्रमाण मानून त्यांनी विद्यार्थी घडवले आहेत. जर विद्यार्थी चागले घडत असतील तर त्या पाठीमागे खंबीरपणे एका शिक्षकाची खूप मोठे योगदान असते. त्या योगदानाची पोहोचपावती म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यामुळे गावाच्या इतिहासात चांगल्या कामाची भर पडली आहे. त्यांना राज्य सरकारनेही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करावा, हीच सदिच्छा ग्रामस्थांच्यावतीने देत आहे. सचिन मोहिते यांनी प्रास्ताविक केले. उज्वला यादव यांनी आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगर - काले (ता. कऱ्हाड) येथे संभाजी यादव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना प्रा. के. एन देसाई, उज्वला यादव ,सचिन मोहिते.