सातारा : वारंवार संधी देऊनही वीजबिल भरण्याकडे कानाडोळा करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कठोर कारवाई सुरु केली आहे. वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महावितरणने थकबाकीदारांचे मीटर-वायर काढून आणण्याचे आदेश बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सोलापूर, सातारा व बारामती मंडळातील अभियंत्यांना आढावा बैठकीत दिले आहेत. ही कारवाई टाळायची असेल तर तातडीने थकीत वीजबिल भरावे, असे आवाहनही पावडे यांनी केले आहे.
कोरोना महामारीत अखंड वीज देऊनही ग्राहकांनी वीजबिल भरण्यास हात आखडता घेतल्याने महावितरणची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. दरमहाची वीज खरेदी व कर्मचाऱ्यांचा पगारासह वितरणाचा खर्च भागवणेही अशक्य झाल्याने अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी राज्यभरात कठोर वसुली मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे प्रादेशिक संचालक (प्र) अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी प्रत्येक विभाग व उपविभागनिहाय पथके तयार केली आहेत. ही पथके वीजबिल वसुलीसोबत वीजचोरांवर कारवाई करणार आहेत. उद्दिष्टपूर्ती न करता कामात कुचराई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
बारामती परिमंडळाची वीजबिल थकबाकी सहा हजार कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षभरापासून वीजबिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ९० हजार ९४८ ग्राहकांकडे ६४ कोटी ४९ लाख रुपये थकबाकी आहे. यात लाखांहून अधिक थकबाकी असलेले ८३९ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १९ कोटींहून अधिकचे वीजबिल थकीत आहे, त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात आहे.