फलटण : ‘मराठा आरक्षण रद्द केल्याने सकल मराठा समाजात उद्रेक निर्माण झाला आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. मात्र, फलटण शहर व तालुक्यात कोरोनाची परिस्थिती भयावह असल्याने मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी कोणतेही आंदोलन करू नये,’ असे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक बी. के. किंद्रे यांनी सकल मराठा समाजाला केले आहे.
फलटण उपविभागीय पोलीस अधीक्षक तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये मराठा आरक्षण निकालाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा फलटणचे समन्वयक यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. ता बैठकीत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारे कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याने त्यांचे उल्लंघन आमच्या हातून होणार नाही व प्रशासनाचे पूर्व परवानगीशिवाय अचानक कोणतेही आंदोलन मराठा क्रांती मोर्चा व इतर संघटना करणार नाही, असे आश्वासन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी दिले आहे. फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मराठा आरक्षणाचे अनुषंगाने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या जातील, अशा सोशल मीडियाद्वारे कोणीही कमेंट्स अथवा फोटो व्हायरल करणार नाही. असे केल्यास संबंधितांवर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असे फलटण शहर पोलीस ठाण्याने सांगितले आहे.