सातारा : ‘राष्ट्रवादीत पंधरा ते वीस वर्षे आमदार म्हणून काम केले. त्या कालावधीत नेत्यांना माझी आठवण क्वचितच व्हायची. पक्ष सोडला की शिवेंद्रराजे नावाचा जपच सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले, शरद पवार यांचा उल्लेख करणारे जयंत पाटील अभयसिंहराजे यांना शेवटच्या पंचवार्षिकमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्याचे राजकारण झाले, हे सांगायला विसरले. मला मंत्रिपदाची हाव असती तर मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी सोडली असती,’ असे रोखठोक उत्तर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्यांनी वीस-वीस वर्षे मंत्रिपदे भोगली. त्यांनी पक्ष अडचणीत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत घरात बसून नवख्यांना दाढेला का दिले? मी मंत्रिपदासाठी पक्ष सोडला, अशी घोकंमपट्टी करणाऱ्या जयंत पाटलांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षातील मातब्बर आणि वर्षानुवर्षे मंत्रिपदे भोगणाऱ्यांनी माघार का घेतली, हेही सांगणे गरजेचे आहे. पवार यांचे नेतृत्व देशात पोहोचले पाहिजे. राज्यात राष्ट्रवादी वाढली पाहिजे, ही खरी भूमिका होती. तर मंत्रिपदे भोगणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार का घेतली? पक्ष अडचणीत असताना नवख्यांना मैदानात उतरवले गेले आणि हे सगळे घरात बसून गंमत बघत राहिले. या मातब्बरांना मंत्रिपदाची लालसा होती. त्यामुळेच ते घरात बसून राहिले. हेही पाटील यांनी सांगणे अपेक्षित आहे.’
मी राष्ट्रवादीत प्रामाणिकपणे काम केले. त्याचे फळ पक्षाने काय दिले? त्यावेळी कोणालाही माझी आठवण व्हायची नाही. पक्ष सोडला की पाटलांचा तिळपापड होत आहे. चाळीस वर्षे प्रामाणिक राहिलेली कुटुंबे पक्ष सोडायचा निर्णय का घेतात, यावरही भाष्य केले पाहिजे. याबाबत त्यांनी व पक्षानेही आत्मपरीक्षण केले पाहिजे. लक्ष्मणराव पाटील यांच्या निवडणुकीच्या तीन-चार महिने आधी अभयसिंहराजे भोसले यांचे निधन झाले. मात्र, त्यानंतर त्यांचा उल्लेखही पक्षातील श्रेष्ठींना करावासा वाटला नाही. मी पक्ष सोडल्यावर पक्षाला फ्लेक्स आणि बॅनरवर भाऊसाहेब महाराजांचा फोटो लावायची गरज वाटली, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.
कधीही दगाफटका नाहीमी पक्षाशी कधीही दगाफटका केला नाही. लोकसभेतही प्रामाणिकपणे काम केले. आता माझी निवडणूक आहे. त्यामुळे मी पक्षातून बाजूला झालो आहे. याचा अर्थ मी पदासाठी बाहेर पडलो, असा होत नाही. ते आमच्या तत्त्वात नाही. माझे घराणे हे शब्दाला जागणारे आहे. राष्ट्रवादीत होतो, तिथे प्रामाणिकपणे काम केले आता भाजपमध्ये आहे. इथेही प्रामाणिकपणेच काम करणार आहे, असेही पत्रकात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे.