काशीळ : पाल येथील मानाच्या यात्रेत गेल्या वर्षी हत्ती बिथरल्याने झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हत्तीसाठी स्वतंत्र ट्रॅक करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले होते. मात्र, यात्रा तोंडावर येवूनही या संदर्भात हालचाली दिसत नाहीत. येथील खंडोबा यात्रेत गतवर्षी काही कारणांनी हत्ती बिथरल्याने पळापळ झाली. त्यात एक जीव हकनाक गेला. यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरीही अशा अनर्थाची वाट पाहण्याऐवजी परंपरा जपून माणसाच्या जिवाचे मोलही जपले जाईल, अशा मध्यमार्गाची गरज लक्षात घेऊन हत्तीसाठी स्वतंत्र ट्रॅक चा पर्याय ‘लोकमत’ने मांडला होता. ‘लोकमत’च्या या भूमिकेला खंडोबा देवस्थान ट्रस्ट, जिल्हाधिकारी, वनविभाग आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यंदा यात्रा जवळ आली तरीही ट्रॅक तयार करण्याच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली गेली नसल्याचे दिसून येते.पाल येथे वृध्देचा मृत्यू झाल्यानंतर प्राणिमित्र, वन अधिकारी, मानद वन्यजीवरक्षक, प्राणिविषयक कायदा समितीचे सदस्य आणि इतर अनेकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून मतप्रदर्शन केले. बहुतेकांनी मिरवणुकीत हत्ती आणूच नये, असे टोकाचे मतही व्यक्त केले. मात्र, तसे केल्यास परंपरा खंडित होऊ शकते. पाळीव हत्तींच्या संदर्भातील वन विभागाचा आदेशही ‘लोकमत’ने त्यावेळी वाचकांसमोर आणला. हा आदेश नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात लागू होत असला, तरी यात्रेत होणारी परिस्थती आदेशात नमूद केलेल्या परिस्थितीसारखीच असते, हेही निदर्शनास आणून दिले होते.कोणत्याही परंपरेला विरोध न दर्शविता केवळ भविष्यकालीन अनर्थ टाळणे हीच ‘लोकमत’ची भूमिका आहे. धोका दिसताच सावध होऊन मार्ग शोधणे ही सामूहिक जबाबदारी असून, जिल्हा प्रशासन, वन विभाग, देवस्थानचे प्रतिनिधी आणि भाविकांनाही वाटा उचलावा लागणार होता. या घटनेला वर्ष उलटून जात असताना, या पार्श्वभूमीवर कोणतीच उपाय योजना न केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. (वार्ताहर)वारीतील रिंगणाचा आदर्शआषाढ महिन्यातील पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा असून, लक्षावधींच्या भावना वारीशी निगडीत आहेत. वारीच्या मार्गावर ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यात तरडगावला उभे रिंगण तर वाखरीला गोल रिंगण होते. या रिंगण सोहळ्यात माउलींचा अश्व वेगाने धावतो आणि लाखो वारकरी दाटीवाटीने, पण शिस्तीने सोहळ्याचा आनंद लुटतात. घोडा धावण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार केलेला असतो. त्यामुळे घोड्याचा माणसांना आणि माणसांचा घोड्याला त्रासच होत नाही. हीच संकल्पना पालच्या यात्रेत हत्तीच्या बाबतीत वापरल्यास सोहळा निर्धोक होऊन भाविकांचा आनंद आणखी वाढू शकेल, अशी अपेक्षाही ‘लोकमत’ने गतवर्षी व्यक्त केली होती.हे होते पर्यायपालची यात्रा सध्या मोकळ्या पटांगणावर भरते. त्यामुळे भाविकांच्या भावना राखून धोका टाळण्यास मोठा वाव आहे.यात्रेतील मिरवणूक मार्गावरून चालण्याचा सराव यात्रेपूर्वी आठ ते दहा दिवस हत्तीकडून करवून घेतला जातो, हेही योग्यच आहे.हत्तीच्या याच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी अडथळे उभे करून हत्तीसाठी सुमारे पंधरा ते वीस फूट रूंदीचा स्वतंत्र ट्रॅक बनविता येईल.‘ट्रॅक’च्या दोन्ही बाजूंनी अडथळ्यांच्या पलीकडून भाविक या मानाच्या गजराजाचे दर्शन घेतील आणि भंडाराही वाहू शकतील. हत्तीच्या जवळपास भाविक पोहोचू शकत नसल्याने माणूस आणि हत्ती दोघांनाही कोणताच धोका निर्माण होणार नाही. काही कारणांनी हत्ती बिथरला तर पोलीस यंत्रणेला आणि स्वयंसेवकांना आपत्कालीन नियोजन करणे सोपे होईल.
पाल यात्रेच्या मिरवणुकीत हत्ती असेल तर ट्रॅक हवाच!
By admin | Published: December 14, 2015 10:31 PM