रामापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने योग्य निर्णय झाला नाही, तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मी येथे कुठल्या पक्षाचा अथवा जातीचा म्हणून आलो नाही, तर भारताचा नागरिक म्हणून आलोय. पाटण येथे गेले ४८ दिवस मराठा समाजाचे चाललेले आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करीत असलो तरी पुढे येणाऱ्या न्यायदेवतेच्या निकालावरती आंदोलनाची पार्श्वभूमी राहील. इतर समाजाला जसा आरक्षणाचा न्याय मिळाला तसा मराठा समाजालादेखील मिळालाच पाहिजे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी पाटण येथे मराठा समाज ठिय्या आंदोलन ठिकाणी ठणकावून सांगितले.
उदयनराजे भोसले म्हणाले, समाजाला आरक्षण मिळाले नाही, तर निवडून दिलेल्या आमदार - खासदारांना खाली खेचा. त्यांना घरातून बाहेर निघून देऊ नका. मराठा समाजाबरोबर इतर समाजातील आमदार - खासदारांना मराठा समाजानेदेखील मतदान केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. लोकांच्या मतावर व जिवावर तुम्ही सत्तेवर आलात. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही तुमची जबाबदारी आहे. नाहीतर, तुम्हाला पदावर बसण्याचा अधिकार नाही. हा लढा अजून संपलेला नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार, असेही उदयनराजे भोसले यांनी शेवटी सांगितले.
या वेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पाटणकर, राजेंद्र यादव, मदन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा समाजाचे ठिय्या आंदोलनकर्ते व मराठा समाज समन्वयक पवन तिकुडवे, यशवंतराव जगताप, शंकर मोहिते, नितीन पिसाळ आदींना उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पाणी देऊन पाटण तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाचे सुरू असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. तर पाटणचे तहसीलदार योगेश्वर टोपे यांना तसे निवेदन देण्यात आले. या वेळी मराठा समाजातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो :