कऱ्हाड : ‘महाविकास आघाडीचे सरकार पडणार आहे, असे कार्यकर्त्यांना गाजर दाखवायचे असते. सरकार अस्थिर आहे, म्हणत पक्षातील आमदारांनाही सोबत ठेवायचे असते. तेच काम भाजप करीत आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, कार्यकालही पूर्ण करेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतिस्थळास आदरांजली वाहण्यास उपमुख्यमंत्री पवार येथे आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सत्तेवर कोणीही असले तरी विरोधी पक्षाला मात्र सरकार पडणार, असे म्हणावेच लागते. १९९५ मध्ये आमचे ८० आमदार होते. आम्ही विरोधात होतो. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरावे लागते. तेच आता भाजप करते आहे. विरोधकांना कार्यकर्ते सोबत ठेवायचे असतात. त्यासाठी सरकार पडणार, असे म्हणावेच लागते. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी निर्माण केली आहे. त्यांचे आशीर्वाद आहेत तोपर्यंत सरकार मजबूत आहे.
केंद्र पाठीशी नाही! कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. केंद्राकडून २९ हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांनी वारंवार पत्र पाठवूनही त्याची दखल घेतली गेली नाही. नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभे राहिलेले नाही, असे पवार यांनी सांगितले.