सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक व आधार क्रमांक सिडिंग करण्यासाठी अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२१ ही देण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक या मुदतीत लिंक होणार नाहीत त्यांना १ फेब्रुवारी २०२१ पासून सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि एपीएल (केशरी) शेतकरी योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेणा-या सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक सिडिंग १०० टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहीम राबवून लाभार्थ्यांचे आधार मोबाइल सिडिंग सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले आहेत.
लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रास्तभाव दुकानांतील ई-पॉस मशीनमधील ई-केवायसी व मोबाइल लिंकिंग सुविधेचा वापर करून आधार व मोबाइल क्रमांक लिंक करता येणार आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण १,६७९ रास्तभाव दुकानांतून ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे व त्याबाबतचे प्रशिक्षणही रास्तभाव दुकानदार यांना संबंधित तालुक्याच्या पुरवठा शाखेमार्फत अलाहिदा देण्यात आलेले आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण १८,२८,२५७ लाभार्थ्यांपैकी अद्यापि ३,०३,२६२ इतक्या लाभार्थ्यांचे आधार सिडिंग झालेले नाही. त्यापैकी जे लाभार्थी दुबार, मयत, स्थलांतरित आहेत किंवा ज्या मुली विवाहित असूनही त्यांची नावे मूळच्या शिधापत्रिकेवर तशीच राहिली आहेत त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवून त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना अधीनस्त सर्व तहसीलदार यांना अलाहिदा देण्यात आलेल्या आहेत.
केवळ आधार सिडिंग न झालेमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अन्नधान्याचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत सवलतीच्या दरातील अन्नधान्याचा लाभ घेणा-या ज्या लाभार्थ्यांचे मोबाइल क्रमांक व आधार क्रमांक अद्यापही लिंक झालेले नाहीत त्यांनी त्यांचे रास्तभाव दुकानदारांकडे आधारकार्डची छायांकित प्रत व अंगठा (थंब) द्यावा व आधार सिडिंग त्वरित करून घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.