सातारा : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला असून दिवसाला आठ हजारांहून अधिक जणांना लस दिली जात आहे. मात्र, मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने लसीची मागणी मोठ्या प्रमाणात केली आहे. गत महिन्यात सातारा जिल्ह्यासाठी तब्बल पाच लाखांचा डोस मागविण्यात आला होता. मात्र, केवळ ८० ते ९० हजार या दरम्यानच जिल्ह्याला डोस उपलब्ध होत आहेत. त्या तुलनेत लस घेणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा सध्या अधिक वाढलेले पहायला मिळत आहे. त्यातच आता ४५ वर्षांवरील व्यक्तींना सरसकट लस देण्याचे शासनाने जाहीर केल्याने लसीचा तुटवडा होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. दिवसाला आठ ते दहा हजार जणांना लस दिली जात आहे. हा लसीचा वेग पाहता एका आठवड्यामध्ये लसीचा साठा संपण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लस पुरविण्यात आली आहे. त्यामुळे दर दोन आठवड्यांना लसीचा ८० हजारांचा साठा जिल्ह्यासाठी आवश्यक आहे.
चौकट : ४५ वर्षांवरील दोन लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरण
जिल्ह्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही लस देण्यात येत आहे. असे साधारण जिल्ह्यात सुरुवातीच्या टप्प्यात तब्बल दोन लाख नागरिक असल्याचे पुढे आले आहे. या सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. हा आकडा आणखी वाढणार असून लस ज्याप्रमाणे उपलब्ध होईल त्या पद्धतीने या ४५ वर्षीय व्यक्तींना लस दिली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली असून सर्व प्राथमिक आरोग्य विभागांना नियोजन करण्यास सांगितले आहे.
चौकट : सध्या मागणी किती
जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून शासनाकडे पाच लाख डोसची मागणी होत आहे. परंतु ८० ते ९० हजार या दरम्यानच जिल्ह्याला डोस उपलब्ध होत आहेत. या उपलब्धतेनुसार अद्याप डोसची कमतरता भासली नाही. मात्र, लस देण्याचा वेग यापेक्षाही वाढल्यास नक्कीच लसीचा तुटवडा होईल, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाचा वेग कमी येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
कोट : आम्ही जिल्ह्यासाठी लस चार ते पाच लाख मागत असतो. परंतु शासनाला इतर जिल्ह्यांनाही लस द्यावी लागते. त्यामुळे लसीचा पुरवठा जेवढी मागणी झाली तेवढा होत नाही. परंतु पुरवठा कमी असला तरी लसीचे प्रमाण, त्याचा वेग आम्ही वाढविलाच आहे.
डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक सातारा
चौकट :
पहिला डोस
आरोग्य सेवक -२६३९७
फ्रन्टलाइन वर्कर्स - २५६०३
ज्येष्ठ नागरिक- ६४०८०
45 वर्षावरील-१५८९०
................
दुसरा डोस.....
आरोग्यसेवक-१५०७९
फ्रन्टलाइन वर्कर-१२०९२