गोंदवले : गोंदवले खुर्द, ता. माण येथील माणगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाया खचत असून, पाणीसाठा झाल्यास खचलेल्या जागेतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. बंधारा कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर असून, पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गोंदवले खुर्दमध्ये माण नदीवर आठ वर्षांपूर्वी राज्य शासन अंगीकृत जिहे-कठापूर उपसा जलसिंचन कुकडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुमारे पस्तीस लाख खर्च करून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम मिहीर इंटरप्रायजेस सोलापूर यांनी पूर्ण केले आहे. बंधारा बांधण्याच्या ठिकाणी नदीपात्रात बहुतांश भाग खडकाळ असल्याने पाया काढताना या ठिकाणी जिलेटीन स्फोट करून ब्रोकरच्या साह्याने पाया खणावा लागला. या जिलेटीन स्फोटाने पाया खालचा खडकाळ भाग पूर्ण हादरला होता. यानंतर बंधारा बांधण्याचे काम संपल्यानंतर नदीला पूर आल्यावर इथे चांगला पाणीसाठा झाला. या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. मात्र, काही दिवसांतच नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधारा रिकामा होऊ लागला. बंधाऱ्यातील पाणी साठ्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पाणी, विहिरींची पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी समाधानी झाले. मात्र, हे समाधान फार दिवस टिकले नाही. नदीचे पाणी आटल्यावर बंधाऱ्यातील पाणी तसेच वाहू लागले आणि बंधाऱ्याच्या पायातून अनेक दगड निसटून पाणी आणखी वाहू लागल्याने बंधारा रिकामा होऊ लागला. नदीपात्रात दक्षिण-उत्तर बंधारा असून, उत्तर बाजूच्या टेकडीमध्ये सुमारे दहा फूट आतपासून सिमेंट बांधकाम आहे. त्या बांधकामाच्या खालून तीन फूट खोल आणि वीस फूट लांब पाया खचला आहे. हा बंधारा लवकरच कमकुवत होऊन ढासळण्याच्या मार्गावर आहे. पाटबंधारे विभागाने वेळेत दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)लोखंडी दारांअभावी पाणी वाया बंधाऱ्याला पाणी अडविण्यासाठी लोखंडी दारे आहेत. मात्र, ही दारे देखील इतरत्र पडलेली असतात. पावसाळ्याच्या दिवसांतसुद्धा अनेकवेळा दारे सापडत नाहीत. त्यामुळे ते पाणी अडविताना अडचण होते. पाटबंधारे विभागाने कितीही पाणी आडवायचा प्रयत्न केला तरी लोखंडी दारांअभावी पाणी वाहून जाते.माण नदीवरील सर्वच बंधाऱ्यांची कामे झाली असून, पाणीसाठा होण्यासाठी पाणी गळती थांबविणे महत्त्वाचे आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अर्जुन शेडगे, सरपंच
साठा झाला की पाणी जातेय वाया
By admin | Published: December 18, 2014 9:22 PM